औरंगाबाद : मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या हज यात्रेचा प्रवास ७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, मागील तीन दिवसांमध्ये ६९९ यात्रेकरू रवाना झाले आहेत. हज कॅम्प आणि चिकलठाणा विमानतळावर यात्रेकरूंना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने यात्रेकरू आणि नातेवाईक उत्साहितआहेत.मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील २,४०५ हज यात्रेकरू यंदा रवाना होणार आहेत. दररोज एका विमानाद्वारे यात्रेकरू जेद्दाह येथे पोहोचत आहेत. रविवारी सायंकाळी ७.२५ वाजता पहिल्या विमानाद्वारे २३३ यात्रेकरू रवाना झाले होते. सोमवार आणि मंगळवारीही अनुक्रमे २३३ यात्रेकरू रवाना झाल्याची माहिती मरकज- ए- हुजाज कमिटीचे करीम पटेल यांनीसांगितले.मंगळवारीही यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी जामा मशीद येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. अशीच काहीशी परिस्थिती चिकलठाणा विमानतळावरही होती. उद्या बुधवारीही सायंकाळी ७ वाजेच्या सुमरास २३३ यात्रेकरूंसह विमान रवाना होणार आहे. त्यानंतर ११ ते १३ सप्टेंबरपर्यंत रात्री २ वाजता विमान यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे.हज यात्रेकरूंना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, एअर इंडिया, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सीआईएसएफ, आरोग्य विभाग, पोलीस, महापालिका आदी शासकीय निमशासकीय संस्था प्रयत्नशील आहेत. जामा मशीद येथे हज कॅम्प तयार करण्यात आला असून, यात्रेकरू दोन दिवस अगोदरच येथे दाखल होत आहेत.
गत तीन दिवसांत ६९९ यात्रेकरू रवाना
By admin | Updated: September 10, 2014 00:52 IST