जालना : परतूर येथे होणाऱ्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात ५५१ जोडपी विवाह बद्ध होणार होते. मात्र, काही त्रुटींमुळे यातील ९० जोडप्यांची नावे कमी करण्यात आलेली आहेत. या विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्र परिषदेत दिली.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, सद्यस्थितीत मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना व दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या दृष्टिने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. संपूर्ण मराठवाड्यात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. त्यानुसार परतूर येथे २४ एप्रिल रोजी सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा होत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मंडप असेल. तसेच औरंगाबाद येऊन फिरते शौचालय आणण्यात येणार आहे. वऱ्हाडींसाठी २० टँकर्स व ३ लाख पाणी पाऊच पुरविले जाईल.तसेच १०० स्वच्छता रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच ५ रुग्णवाहिका आणि ५० डॉक्टरांचे पथक कार्यरत राहतील. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदी ७० ठिकाणी मंडप उभारले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात- लोणीकर
By admin | Updated: April 20, 2016 23:22 IST