शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. अशा स्थितीतही वाहिन्यांची डागडुजी करून महापालिकेला पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा लागत आहे. मात्र, वारंवार वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत असल्याने अधूनमधून पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जालाननगर उड्डाणपुलालगत १,४०० मि.मी. व्यासाची वाहिनी फुटली. मात्र, गळती कमी असल्यामुळे वाहिनीतून पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला. दुपारी ४ वाजता या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. वाहिनी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेनंतर वेल्डिंगचे काम सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू होईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले. सिडको- हडकोसह शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, मंगळवारी पाणीपुरवठ्याचा टप्पा असलेल्या सिडकोतील काही वसाहतींत पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
कारण नसताना सिडकोत निर्जळी
सिडकोतील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा दिवस होता, त्यातील काही भागात पाणीपुरवठा झालाच नाही. नळांना पाणी येण्याचा दिवस असल्याने नागरिकांनी बराच वेळ वाट पाहिली. मात्र, नंतर पाणी एक दिवस उशिराने येणार असल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांना खासगीतून टँकर मागवावे लागले, तर काहींनी परिसरातील हातपंपांकडे धाव घेतली.