लोहारा : तालुक्यातील सास्तूरसह परिसरात गुरुवारी ९ वाजून ४१ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्यामुळे नागरिक घराबाहेर धावले. या भागात झालेल्या भूकंपाने पुन्हा एकदा १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपाची आठवण करून दिली. या धक्याने कसलीही जिवित हानी झाली नाही. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना भीतीपोटी कडाक्याच्या थंडीतही घराबाहेर पडावे लागले. घरात बसल्यानंतर घरावरील पत्र्यांचा आवाज आल्याने आपण घराबाहेर पळत सुटलो, असे सास्तूर येथील महेश स्वामी यांनी सांगितले. कोंडजीगड येथील सरपंच शाहुराज नेलवाडे तसेच होळीचे पोलीस पाटील अंकुश गायकवाड यांनीही सुमारे दहा सेकंद जमीन हादरल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत लातूर येथील भूकंपमापन केंद्राचे एस. बी. आम्ले यांच्याशी संपर्क साधला असता, ९.४० च्या सुमारास नेपाळ, बिहार सरहद्दीवर भूकंप झाला आहे. त्यामुळेच भूकंपप्रवण असलेल्या सास्तूर परिसरातील गावात जमिनीला कंप झाला असावा, असे त्यांनी सांगितले.
सास्तूर परिसरात जमीन हादरली
By admin | Updated: December 19, 2014 00:56 IST