नळदुर्ग : सावकाराकडे अडकलेल्या १ हेक्टर ९३ आर बागायत जमिनीची कागदपत्रे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी होर्टी (ता़तुळजापूर) येथील शेतकऱ्यास सुपूर्द केली़ सावकाराने हडपलेली जमीन परत मिळाल्याने शेतकऱ्याच्या वृद्ध मातेने जिल्हाधिकाऱ्यांचे औक्षण केले़ सावकाराकडील जमिनीची कागदपत्रे परत मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता़होर्टी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाबूराव राजमाने उर्फ पाटील यांचे वडील बाबूराव राजमाने यांनी दयानंद गुळवे याच्याकडून १ लाख ११ हजार रूपये व्याजाने घेतले होते़ या पैशाची हमी म्हणून प्रारंभी १० आर जमीन खरेदीखत करून दिले होते़ तर ज्ञानेश्वर राजमाने यांनी नंतर १ लाख १४ हजार रूपये व्याजाने घेऊन दयानंद गुळवे यांची पत्नी भारतबाई नकाते यांना तारण म्हणून १ हेक्टर ३ आर जमीन खरेदीखत करून दिली होती़ त्यानंतर राजमाने यांनी २००५ ते २०१० या कालावधीत व्याजासह पाच लाख रूपये सावकारास परत दिले होते़ पैसे घेऊनही सावकार जमीन देत नसल्याने राजमाने यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर पंचनामा करून अधिकाऱ्यांनी सावकारकी विरोधात अहवाल दिला होता़ या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ या प्रकरणात सावकार दयानंद गुळवे, भारतबाई नकाते, श्रीकांत गुळवे यांनी सावकारकी करून तीन गावातील आठ शेतकऱ्यांची जवळपास १० हेक्टर जमीन हडप केल्याची तक्रारही करून त्याबाबतच्या ३८ नकला पुराव्यासाठी जोडल्या होत्या़ या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर सावकाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रशासकीय प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी रविवारी राजमाने कुटुंबाकडे त्यांच्या जमिनीची कागदपत्रे परत केली़ यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील, सहाय्यक निबंधक मकरंद शहापूरकर, नायब तहसीलदार जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, गामस्थ उपस्थित होते़ जिल्हाधिकाऱ्यांनी राजमाने यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे दिल्यानंतर त्यांची वृद्ध आई भामूबाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे औक्षण केले़ सावकाराने लाटलेली जमीन परत मिळाल्याने राजमाने कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता़ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ शिवाय सावकारी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी व शनिवारी काम करण्यात येते़ याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा़ शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांना पतपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे़ शिवाय शेतकरी बचत गट स्थापन करून आर्थिक सहाय्य करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगितले़
सावकाराने हडपलेली जमीन अखेर शेतकऱ्यास परत
By admin | Updated: March 21, 2016 00:20 IST