तुळजापूर : शेतातातील पिशवीत ठेवलेले १२ हजाराचे मणीमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना शनिवारी दुपारी सारोळा (ता़तुळजापूर) शिवारात घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित शहरातून एकास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सारोळा शिवारात छाया मंडागळे या शनिवारी शेतात काम करीत होत्या़ त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र अचानक तुटले़ तुटलेले मणीमंगळसूत्र मंडागळे यांनी जवळच्या पिशवीत ठेवून दिले़ त्यानंतर त्या परत शेतात कामाला लागल्या़ मात्र, सायंकाळी त्यांनी परत जावून पाहिले असता मणीमंगळसूत्र चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याबाबत छाया मंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेतील एका संशयिताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील दीपक चौकात असलेल्या इराप्पा पवार (रा़ बोरदनवाडी) याला ताब्यात घेतले़ त्याने चोरीची कबुली देत जवळील १२ हजाराचे मणीमंगळसूत्रही पोलिसांना काढून दिले़ ही कारवाई पोलीस उपाधीक्षक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली़ (वार्ताहर)
शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिने लंपास
By admin | Updated: February 8, 2016 00:15 IST