कडा : आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये लिंब, चिंच, वड आदी डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल होत आहे. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने मोठ-मोठे वृक्ष भुईसपाट होत आहेत. यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आष्टी तालुक्यात पडतो. त्यामुळे या तालुक्यात ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश मोठ्या प्रमाणात दिला जातो. येथे तहसील, पंचायत समिती, सा. बां. विभाग, वनविभाग आदींकडून मोठ्याप्रमाणात ‘एक झाड, एक व्यक्ती’चा प्रयोगही राबविला जातो. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवाचा जप होत असला तरी दुसरीकडे मात्र, आहेत त्या वृक्षांवर दिवसा ढवळ्या कुऱ्हाड चालविली जात आहे. हे प्रकार राजरोस होत असल्याने व कारवाई होत नसल्याने ‘लाकूड माफियां’चे फावले जात आहे. तालुक्यात आष्टी, कडा, धानोरा या ठिकाणी अधिकृत आरा मशीन आहेत. मात्र, इतर ठिकाणी अनेकांनी विनापरवाना आरा मशीन सुरू केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात लिंब, चिंच, वड, बाभूळ, जांभूळ आदी वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात येते. तोडलेले वृक्ष दिवसाढवळ्या ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनांतून वाहतूक केल्या जातात. अनेकदा अशी वाहने पोलीस ठाण्यांच्याही परिसरातून जातात. मात्र, अशा अवैध वृक्षतोडीवर ना वनविभागाचे लक्ष आहे ना पोलीस यंत्रणेचे. यामुळे वृक्षतोडणाऱ्यांचे फावले जात आहे. दादेगाव, रोडागिरी, सावरगाव, वेलतुरी, धामणगाव, सु.देवळा या भागातील वनक्षेत्रातूनही वृक्षतोड केली जाते. वनविभागातील काही कर्मचारी व वृक्षतोड करणारे यांच्यात अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने वृक्षतोडीकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप प्रा. भागचंद झांजे यांनी केला आहे. राज्य तसेच जिल्हामार्गालगत अनेक ठिकाणी वृक्षतोड सुरू असते, मात्र रस्त्याने जाणारे वनविभागासह इतर अधिकारी काही वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केला आहे. येथे तोडलेले वृक्ष नगर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी विकले जातात. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड रोखण्याची मागणी सचिन वाघुले यांनी केली आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी एस. एम. शेख यांना फोन केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. (वार्ताहर)लाकूड माफियांवर कारवाईची मागणी आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी आहेत अनधिकृत आरा मशीनदिवसाढवळ्या वृक्षतोड होत असल्याने ग्रामस्थांमधून होतोय संताप व्यक्तमोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने शिवार होत आहेत ओसाडतोडलेल्या वृक्षांची होतेय उघड्या वाहनांतून वाहतूकतोडलेल्या वृक्षांची नगर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होते विक्रीअवैध वृक्षतोडीवर नागरिकांची कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वृक्षांवर कुऱ्हाड
By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST