औरंगाबाद : अनिवासी भारतीयांचा कोट्यवधींचा फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून सामान्यांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील प्रमुख सदस्य निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट यांची गुरुवारी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.पुणे येथील रहिवासी असलेले निवेदिता आणि विश्वनाथ अवचट यांना ३१ डिसेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईत अटक केली होती. टोळीचा प्रमुख हा अशोक जंगम (मुंबई) यालाही पोलिसांनी धारावीतून शिताफीने पकडून आणले. जंगम हा सध्या पोलीस कोठडीत असून, त्याला सोबत घेऊन तपास कामासाठी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, फौजदार सुभाष खंडागळे यांचे पथक मुंबईला गेलेले आहे. त्याची घरझडती घेण्यात येणार आहे. तसेच त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याचे पो.नि. सावंत यांनी सांगितले. पोलिसांनी तपासात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल न्यायालयात सादर केला. या आरोपींनी सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांनी मुंबई, पुणे, नांदेड, परभणीसह अन्य शहरांतील लोकांना फसविले आहे. औरंगाबादच्या अभिजित कुलकर्णी यांना त्यांनी ३५ लाखांचा गंडा घातला होता.
कुलकर्णी, अवचट यांची हर्सूल कारागृहात रवानगी
By admin | Updated: January 15, 2016 00:05 IST