औरंगाबाद : वाढत्या दुचाकी चोरीमुळे वाहनमालकांची चिंता वाढली आहे. केवळ २०० ते २५० रुपये खर्चून पारंपरिक लोखंडी साखळदंडात जखडून कुलूप दुचाकीला लावा, अथवा मेकॅनिककडून दुचाकीमध्ये एक यंत्रणा बसविल्यास चोरट्यांना सहज दुचाकी पळविता येणार नाही, अशी युक्ती पोलीस अधिकाऱ्यांनी सुचविली आहे.
सध्या स्वयंचलित दुचाकीच्या किमती लाखाच्या वर गेल्या आहेत. काबाडकष्ट करून खरेदी केलेली दुचाकी चोरटे केव्हा पळवतील याचा नेम नाही. कधीकाळी रात्री घडणाऱ्या चोरीच्या घटना दिवसाढवळ्याही घडू लागल्या आहेत. यामुळे दुचाकी सुरक्षेची चिंता वाहनमालकांची झोप उडवते आहे. औरंगाबादेत दरवर्षी सरासरी ९०० दुचाकींची चोरी होते. पोलिसांना चकवा देऊन चोरटे रोज सरासरी तीन मोटारसायकली पळवीत असल्याचे दिसते. २०१९ मध्ये शहरात ८३६ दुचाकी चोरीला गेल्या होत्या. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागला. तरीही तब्बल ५८३ दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच. चोरीस गेलेली दुचाकी पुन्हा सापडण्याचे प्रमाण नगण्यच आहे. यावर्षी दोन महिन्यांत चोरट्यांनी पावणेदोनशे दुचाकी पळविल्या आहेत.
अशी होते सहज चोरी
दुचाकी चोरीच्या घटना कशा रोखाव्यात याविषयी मोटार मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद चाँद म्हणाले की, अवघ्या २०० ते २५० रुपयांचा खर्च करून नागरिक त्यांची लाखाची दुचाकी सुरक्षित ठेवू शकतात. चोरी रोखणे १०० टक्के शक्य नाही. मात्र, चोरट्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणे आपल्या हाती आहे. दुचाकीवर बसून चोरटा पायाने झटका देऊन दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडतो. हे लॉक तोडताच तो दुचाकीचे इंजीन सॉकेट जोडून विना चावी दुचाकी चालू करतो आणि दुचाकी घेऊन जातो किंवा मास्टर चावी वापरून दुचाकी पळवितात.
=======================
कशी ठेवावी दुचाकी सुरक्षित ?
जाड साखळीसह कुलूप लावा
दुचाकीच्या चाकाला लोखंडी साखळीसह कुलूप लावले तर हे कुलूप आणि साखळी तोडल्याशिवाय चोरट्याला दुचाकी नेता येणार नाही. एवढा वेळ चोरांकडे नसतो. त्याला काही मिनिटांत दुचाकी चोरून न्यायची असते. यामुळे साखळदंड लावलेली दुचाकी चोरण्याचे तो टाळतो.
======?========
दुचाकीच्या चावीचे स्वीच तपासा
कोणत्याही मोटारसायकलचे चावीचे स्वीच वापरून खराब होते. चालू स्थितीत दुचाकीची किल्ली निघत असेल तर चोरटे त्यांच्याजवळील चावी दुचाकीला लावून दुचाकी चोरी करून नेऊ शकतो. यामुळे सर्वप्रथम अशा दुचाकीचे स्वीच बदलून टाका.
====(======(((==
कोट
निष्णात मेकॅनिकडून उपाययोजना करा
दुचाकी चोरी रोखण्यासाठी मेकॅनिकल असोसिएशनने उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार दुचाकीला सेफ्टी यंत्र बसविणे, स्टँडला लोखंडी पट्टी बसवून घ्यावी, जेणेकरून तुमच्या विरहित दुचाकी जागेवरून हलणार नाही. या उपाययोजना करण्यासाठी केवळ २०० ते २५० रुपये खर्च येतो. या रकमेत लाखाची गाडी सुरक्षित ठेवता येईल. साखळी बांधण्याचा उपाय उत्तम आहे.
- अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा.
चौकट
दोन वर्षांत ८ ते १० कोटींच्या दुचाकी चोरट्यांनी पळविल्या
शहरात दोन वर्षांत चोरी झालेल्या एकूण दुचाकींपैकी तब्बल एक हजार दुचाकींचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. आजच्या बाजारभावाचा विचार केला तर सरासरी ८ ते १० कोटी रुपयांची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येते.
===