वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील जि. प. शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणून देण्यात येणाऱ्या खिचडीच्या डाळीत सोनकिडे व जाळे आढळले. या प्रकाराबद्दल पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा या हेतूने शासनाने शालेय मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी देण्यात येते. विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळे पदार्थ शाळेमार्फत दिले जातात. परंतु वडगाव कोल्हाटी जि. प. प्राथमिक शाळेला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य मिळत आहे. डाळीला सोनकिडे व जाळे लागले आहेत.डाळीला कीड लागून तिचे तुकडे तुकडे झाले आहेत. वडगाव कोल्हाटी जि. प. शाळेत एकूण ५५७ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना रोज मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी, वरण-भात, उसळ, मटकी दिली जाते. या शाळेत बहुतांशी गोरगरिबांची व कामगारांची मुले आहेत.शाळेत सकस की निकृष्ट अन्न मिळते हे बहुतांशी पालकांनाच माहीत नाही. शाळेत खिचडी मिळते एवढेच माहीत आहे. शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा साळे यांनी पाहणी केली असता खिचडीच्या डाळीला मोठ्या प्रमाणात सोनकिडे व जाळे झाल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली व पुढील वापरास बंदी केली. अन्यथा आणखी कित्येक दिवस विद्यार्थ्यांना त्या डाळीची खिचडी खावी लागली असती हे समजण्यापलीकडे आहे.
खिचडीच्या डाळीत सोनकिडे व जाळे
By admin | Updated: February 14, 2015 00:11 IST