सेवली : लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी जात असताना दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव वीट वाहतुकीच्या रिकाम्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील नवरदेवासह दोन जण ठार झाले. ही घटना ढगी ते शंभूसावरगाव रस्त्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अनिल हनुमंत गजमल व पांडुरंग बाबूराव पवार (दोघे रा. शिंदे टाकळी ता. सेलू जि. परभणी) अशी त्या तरूणांची नावे आहेत.परभणी जिल्ह्यातील शिंदे टाकळी येथील अनिल गजमल याचा विवाह येत्या २८ मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील पान्हेरा येथे आयोजित करण्यात आला होता. या विवाहाची पत्रिका नातेवाईकांना वाटप करण्यासाठी अनिल व त्याचा मित्र पांडुरंग पवार हे मोटारसायकल (एमच २० डी.पी. २२९५) ने सेवलीकडे असताना बीड जिल्ह्यातून सिरसाळा येथून विटा सेवलीत देऊन परतणारा भरधाव रिकाम्या ट्रक ( एम.एच १२ क्यू ४- ८८४८) ने दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर ट्रकही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. ते दोघे गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. याच वेळी सेवली पोलिस ठाण्याची जीप एका ठिकाणी बंदोबस्तात जात होती. त्यातील राधेश्याम गौड, बी.व्ही. शेटे, बी.एम. नागरे, होमगार्ड योगेश कायंदे, चालक बिराजदार यांनी तात्काळ दुसऱ्या एका खाजगी वाहनातून दोन्ही जखमींना नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. गंभीर जखमींना जालना येथे हलविले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. (वार्ताहर)
भरधाव ट्रकच्या धडकेत नवरदेवासह एक ठार
By admin | Updated: March 21, 2016 00:16 IST