औरंगाबाद : काबरानगर येथे घरासमोर खेळत असताना शनिवारी (दि. ३ मे) अपहरण झालेल्या मशिरा फातेमा ऊर्फ खुशी या पाचवर्षीय चिमुकलीची सुटका करण्यात जवाहरनगर पोलिसांना यश आले. काही दिवसांपूर्वी काबरानगर येथे घराशेजारी राहणार्या आरोपीनेच तिचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या पत्नीला अटक केली असून तो फरार झाला आहे. मशिरा ही ३ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरासमोर खेळत असताना आरोपी सय्यद रफिक सय्यद रसूल (४०, रा. जटवाडा रोड) याने तिचे अपहरण केले होते. हडको कॉर्नर येथे राहणार्या शेख आजम या नातेवाईकाच्या घरी त्याने मशिराला ठेवले होते. मशिरा ही स्वत:ची मुलगी असून दुसर्या दिवशी तिला घेऊन जातो असे सांगून तो तेथून निघून गेला होता. सय्यद रफिक सय्यद रसूल याने ३ मे रोजी मशिराला घरासमोरून उचलून नेले आणि तिच्या आईला फोन करून मशिराच्या मावशीसोबत लग्न लावून द्या आणि चिमुरडीला घेऊन जा असे सांगितले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनोळखी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद इंगळे, पोहेकॉ ठोंबरे, शेख मशुद्दीन, गोरे, ठाकूर यांनी आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन काढून त्याचा शोध सुरू केला. त्याचे वर्णन केवळ चिमुरडीच्या वडिलांनाच माहीत होते. त्यांना सोबत घेण्यात आले होते; मात्र तो सापडत नव्हता. त्यानंतर जटवाडा रोडवरील वीटभट्टीवर जाऊन त्याची पत्नी सय्यद रुकसाना हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा तिने पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र तिला पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी पतीने मशिरा हीस हडको कॉर्नर येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आजम खान यांच्या घरातून मशिरा हीस ताब्यात घेतले. ती सुखरूप असून आरोपीने आजमखान यांना खोटे सांगून त्या मुलीला त्यांच्या घरी ठेवल्याचे समजले. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीला पाठीशी घालणार्या रुकसाना हीस पोलिसांनी अटक केली आहे. दोन बायकांचा दादला दोन बायकांचा दादला असलेला आरोपी जटवाडा रोडवरील वीट भट्टीवर राहतो. आरोपी हा मशिराच्या घराशेजारी काही दिवस राहत होता. त्या काळात त्याने चिमुरडीच्या मावशीसोबत लग्न करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आधीच दोन बायकांचा दादला असलेल्या आरोपीसोबत आपल्या बहिणीचे लग्न लावून देण्यास मशिराच्या आईने नकार दिला होता. त्याचा आरोपीला राग आला होता.
अपहृत मुलीची सुटका
By admin | Updated: May 8, 2014 00:22 IST