प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादसोयगाव तालुक्यातील काळदरी, वेताळवाडी हे दोन्ही तांडे अजिंठ्याच्या डोंगरकुशीत वसले आहेत. उंच डोंगरावरून कधी दरड कोसळू शकते याचा नेम नाही. त्यामुळे येथे पक्की घरे कमीच आहेत. बहुतांश झोपड्याच उभारल्या आहेत. सुदैवाने आजपर्यंत येथे दुर्घटना घडली नाही. मात्र, अजिंठ्याच्या घाटात अधूनमधून दरड कोसळत असते. सोयगावपासून ६० किलोमीटरवर काळदरी हा सोयगाव व कन्नडच्या सीमेवर वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. नावाप्रमाणेच या गावात प्रकाशापेक्षा अंधार जास्त वेळ असतो. ही काळदरी तिन्ही बाजूंनी भल्यामोठ्या डोंगराने वेढली आहे. पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूंनी डोंगर व हवा येण्यास उत्तर बाजूचे मोकळे रान. या तांड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सूर्य सकाळी ८ वाजता उगवितो आणि ४ नंतर मावळतो. येथे प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. यामुळे गावाला औरंगाबादेतील कोकण असेही म्हणतात. येथे महाकाय डोंगराच्या कुशीत तीन तांडे आहेत. तेथे सुमारे ४२ झोपड्या असून ४७२ लोक त्यात राहतात. या डोंगरावरून दरड कोसळली तर थेट तांड्यावरच पडू शकते. येथील रहिवाशांनी सांगितले की, डोंगरावर घनदाट झाडी असून त्यांनी तेथील माती धरून ठेवलेली आहे. येथे अधूनमधून दरड कोसळते; पण किरकोळ स्वरूपात. मोठी दरड कोसळली नसल्याचे येथील ज्येष्ठांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी प्रचंड पावसाने येथील भाताची शेती व काही झोपड्या वाहून गेल्या होत्या. त्याच वेळी अजिंठा घाटावरही दरड कोसळून वाहतूक ठप्प होते.
काळदरी, वेताळवाडी डोंगराच्या कुशीत
By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST