सेलू : निपाणी टाकळी - करडगाव या चार कि़ मी़ रस्त्याची दुर्दशा झाली असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़ निपाणी टाकळी ते करडगाव या चार कि़ मी़ अंतराच्या रस्त्याची चाळणी झाली आहे़ मागील पंधरा वर्षांपासून या रस्त्याची डागडूजी न झाल्याने रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे़ रस्त्याच्या प्रश्नी करडगावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता़ त्यानंतर प्रशासनाकडून रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे म्हटले होते़ प्रत्यक्षात मात्र अजूनही रस्ता दुरूस्तीच्या हालचाली झालेल्या नाहीत़ जवळपास एक हजार लोकवस्तीचे हे गाव असून सहाशे पन्नास पेक्षा अधिक या गावात मतदार आहेत़ रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे दुचाकी, चारचाकी व बैलगाडी चालविणे देखील या रस्त्यावर अवघड झाले आहे़ पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे होते. रस्त्याअभावी रूग्णांनाही वेळेवर उपचार मिळत नाहीत़ तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अडचणीही निर्माण झाल्या आहेत़ चार किमी अंतराचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी भरीव निधीची आवश्यकता आहे़ मात्र साधी दुरूस्तीही या रस्त्याची करण्यात आलेली नाही़ परिणामी ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर २७ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
करडगावकरांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST