उस्मानाबाद : हातपंप, विद्युतपंप देखभाल व दुरूस्तीच्या कर वसुलीमध्ये कळंब, लोहारा आणि तुळजापूर या तिन्ही पंचायत समित्या पिछाडीवर आहेत. यांची करवसुली पन्नास टक्क्याच्या आत आहे. तर परंडा पंचायत समितीने ९९.९२ टक्के इतकी विक्रमी वसुली केली आहे.जिल्हा परिषद यांत्रिकी उप विभागाअंतर्गत चार ते साडेचार हजार हातपंप येतात. तसेच विद्युतपंपही मोठ्या प्रमाणात आहेत. यांची देखभाल व दुरूस्तीची कामे ही यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून केली जातात. यासाठीचा कर पंचायत समित्यांनी भरणे अपेक्षित असते. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये आठ पंचायत समित्यांकडून ७७ लाख ३२ हजार ९६१ रूपये एवढी कराची रक्कम वसूल होणे अपेक्षित होते. यामध्ये उस्मानाबाद पंचायत समितीकडून ६ लाख ४५ हजार ३५९, तुळजापूर १० लाख २२ हजार ३०३, उमरगा १० लाख १२ हजार ३५९, कळंब ११ लाख २३ हजार १६०, भूम ६ लाख ६६ हजार ९९९, परंडा १५ लाख ९८ हजार ४०७, लोहारा ६ लाख ९२ हजार ७९१ आणि वाशी पंचायत समितीकडून ९ लाख ७१ हजार ५८३ रूपये कर येणे अपेक्षित होते. यापैकी मार्चअखेर ५१ लाख २१ हजार ५१६ रूपये कर वसूल झाला आहे. आणखी २६ लाख ११ हजार ४४५ रूपये इतकी रक्कम थकित आहे. याबाबत यांत्रिकी विभागाचे उपअभियंता हिराकांत सर्जे यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित पंचायत समित्यांना कराची रक्कम भरण्याबाबत कळविले होते. यापैकी काही पंचायत समित्यांची कर वसुली चांगली झाल्याचे ते म्हणाले. उर्वरित थकबाकीही तातडीने वसूल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कळंब, लोहारा, तुळजापूर पिछाडीवर
By admin | Updated: April 17, 2015 00:39 IST