नितीन कांबळे , कडा आष्टी मतदारसंघ हा राष्टÑवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्यासाठी ‘होम पिच’ होते. या होमपिचवरही त्यांची पिछेहाट झाल्याने मतदारांचा वार त्यांना जिव्हारी लागला आहे. या मतदारसंघातून धस यांना लीड मिळणार नाही, अशी कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, मात्र मतदारांच्या मनात वेगळेच होते. यासठी दरेकर, धोंडे यांची जोडगोळीही कामाला आली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघ हा सुरेश धस यांच्यासाठी होमपिच आहे. याच मतदारसंघातून विधानसभेला धस यांना मोठ मताधिक्य होते. तसेच धस यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळपर्यंत धस यांना माजी आ. साहेबराव दरेकर व माजी आ. भीमराव धोंडे यांचीही साथ होती. यामुळे धस त्यांचा हा बालेकिल्ला एकहाती लढतील, अशी आशा भल्या-भल्यांना होती. मात्र, झाले वेगळेच. प्रचाराचे वातावरण तापले तसे फासे उलटे पडू लागले. साहेबराव दरेकर व भीमराव धोंडे दोघांनीही गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व स्विकारले. याचा पहिला मोठा धक्का राष्टÑवादीला बसला. कारण या दोघांच्या भाजप प्रवेशाने आष्टी, शिरूर व पाटोदा या तिनही तालुक्यात भाजपला पाठबळ मिळाले. यामुळे प्रचारात कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्याचा फायदा भाजप कार्यकर्ते तळागळापर्यंत पोहोचण्यात झाला. आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांनी पाहिजे त्या प्रमाणात वेळ दिला नाही. याला त्यांचा ‘ओव्हर कॉन्फिडंस’ही कारणीभूत ठरला आहे. याची उणीव प्राजक्ता धस व मुलगा जयदत्त यांनी भरून काढली. प्राजक्ता धस यांनी आष्टी मतदारसंघात प्रचाराची ‘बागडोर’ सांभाळली, कोणाला कशाचीच उणीव पडू दिली नाही, जयदत्त धस यांनीही रात्रंदिसव प्रयत्न केले, मात्र मतदारांच्या मनात वेगळेच होते. धस यांच्या कामाचा गवगवा होत होता. प्रत्यक्षात ही कामे कागदावरच झाली की त्या-त्या ठिकाणी झाली, हे घटनास्थळी पाहणी केल्यावरच समजून येते. काही दिवसांमध्ये राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वाढली होती. याचा जाच नागरिकांना नाहक सहन करावा लागत होता. याचा रोषही मतदारांमध्ये होता. वास्तविक पाहिले तर सुरेश धस यांच्या शब्दाला या मतदारसंघात मोठे वजन आहे. येथे ‘आण्णा’ म्हणतील तीच पूर्वदिशा असते, असे असतानाही फासे का उलटे पडले. या होमपिचवर भाजप उमेदवारास मताधिक्य आहे. होमपिचवर झालेला मतदाराचा हा ‘वार’ धस यांना जिव्हारी लागला आहे, हे मात्र नक्की.
‘होम पिच’वरचा वार धस यांच्या जिव्हारी
By admin | Updated: May 18, 2014 00:46 IST