जालना : जालना शहरात मोठी बाजारपेठ असल्याने मराठवाड्यातून नागरिकांचा येथे वावर असतो. उन्हाळ्यात चौकाचौकांत पाणपोर्इंची स्वंयसेवी संस्था वा विश्वस्तांकडून व्यवस्था केली जाते. या परपंरेला २५ वर्षांची परपंरा आहे. मात्र, काही अपवाद वगळता इतर चौकांत पाणपोई सुरू करण्याची गरज आहे. जैन संघटनेच्या वतीने शहरातील वीर सावरकर चौकात, बसस्थानक परिसरात जगदीश नथ्थूमल वासुदेव , पोलिस कॉम्प्लेक्स येथे कांतीलाला विठोबा यांच्या वतीने तर उत्तमराव बन्सीलाल लुटे सेवाभावी संस्थेच्या वतीने परिसरातच पाणपोई सुरू करण्यात आली आहे. हे अपवाद वगळता रेल्वेस्थानक चौक, मुथा बिल्डींग परिसर, पाणीवेस परिसर, गांधी चमन, शनिमंदीर चौक, भोकरदन नाका, शिवाजी पुतळा परिसर आदी ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन तहानलेल्या जीवांना आधार देण्यासाठी पाणपोई सुरू करण्याची गरज आहे. बाहेरगावाहून जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते. किंवा मग पाणीपाऊच, बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. जालना शहर हे उद्योगांचे शहर असल्याने उद्योजकांची मोठी संख्या आहे. तशी दातृत्वाचीही मोठी परंपरा शहराला लाभलेली आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर वर्दळीच्या चौकांमध्ये स्वयंसेवी संस्थानी तहानलेल्या जीवांना आधार देण्यासाठी पाणपोई सुरू करावी, असा संकल्पच जागतिक जलदिनी करण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने जागतिक दिन साजरा केल्याचे समाधान मिळेल. अन्यथा अन्य दिनासारखे हाही औपचारिकता म्हणून साजरा होईल. (प्रतिनिधी)
जालना शहरात पाणपोर्इंची परंपरा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 01:10 IST