जालना : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही रिक्षाचालकांनी बंद कायम ठेवल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे अत्यंत हाल झाले. विशेषत: रुग्णालयात उपचारासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबना झाली. बाहेरगावाहून आलेल्या अनेक प्रवाशी बॅग, पिशव्यांचे ओझे सहन करीत पायी चालत असल्याचे चित्र वेगवेगळ्या रस्त्यांवर दिसले. शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली मागील काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या थांब्यांवरील काही रिक्षाचालकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करून रिक्षाचालकांनी मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारला. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षांचा त्यात अपवाद असला तरी अन्य सर्व वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या अनेक रुग्णांची रिक्षा बंदमुळे पंचाईत झाली. काही मालवाहू रिक्षांचा आधार घेत अशा रुग्णांनी दवाखाने गाठले, परंतु त्यासाठी त्यांच्या खिशाला नेहमीपेक्षा अधिक झळ बसली. विशेषत: जिल्हा रुग्णालयात आज अपंग रुग्णांची तपासणी असल्याने अशा रुग्णांना त्याचा सर्वाधिक त्रास सोसावा लागला. (प्रतिनिधी)
जालनेकर वेठीलाच..
By admin | Updated: January 15, 2015 00:08 IST