----------------------------------
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
वाळूज महानगर : वाळूज परिसरात बंदी घातलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि.४) कारवाई केली. या भागातील बकवालनगरात मांजाची विक्री करणाऱ्या कविता चांडक (रा. बकवालनगर) व वाळूजच्या नारायणनगरातील यमुनाबाई शिंदे (रा.वाळूज) यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. या महिलांच्या ताब्यातून नायलॉन मांजा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
------------------------
उद्योगनगरीत पावसाच्या सरी
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत सोमवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने अनेकांची धांदल उडाली होती.
उद्योगनगरीत गत दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडीचा जोरही ओसरला आहे. या परिसरात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. पंढरपुरात वीज पुरवठाही सतत खंडित होत असल्याने नागरिक व व्यावसायिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
-------------------------------