हिंगोली : जिल्हा परिषदेकडून निर्मलग्राम अभियानासह आयएसओ व सीएससी उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून प्रशासकीय गतिमानतेला चालना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रमनिहाय प्रत्येक तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.निर्मलग्राम गाव होण्यासाठी काही गावांत थोडक्या लोकांनी शौचालय बांधले नसल्याने अडचण येत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील अशी दहा गावे निवडून त्यांना प्राधान्याने काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी पाचही तालुक्यात प्रत्येकी दहा याप्रमाणे पन्नास ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी दिली.त्याचबरोबर वरीलप्रमाणेच प्रत्येक तालुक्यातील १0 ग्रामपंचायतींना आयसओ मिळण्यासाठी व सीएससी हा उपक्रम राबविण्यासाठी निवडले आहे. आयएसओसाठी अभिलेखे अद्ययावत ठेवण्यासह इतर सर्व बाबींकडे लक्ष दिले जाणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी शिबीर घेतले जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जेथे कनेक्टिव्हीची अडचण आहे, तेथे काय उपाययोजता येतील, याबाबतही विचारविमर्श सुरू असल्याचे जाधव म्हणाले. यातील ग्रामपंचायतींची निवड करताना या बाबींची पडताळणी अगोदरच करण्यात आली असली तरी भविष्यात कोणतीच अडचण न येण्यासाठी ही आखणी केली आहे. सीएससीचे काम संग्राम कक्षांतर्गत चालणार आहे. त्यातच नवे फायनान्सर इन्क्लुजर देण्याचे दीडशेचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
आयएओ, निर्मलसाठी जि.प. सरसावली
By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST