औरंगाबाद : यापूर्वी आणि आतादेखील उद्योगांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच पुनश्च एकदा सर्व उद्योगांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ११ मार्चपासून लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्योगांना सहकार्य करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये खंड पडणार नाही, असा आशावाद ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना ‘सीएमआयए’चे कमलेश धूत म्हणाले की, शहरात ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मागील वर्षात लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. यापार्श्वभूमीवर गुरुवारपासून होऊ घातलेल्या लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्यात आले असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नाही. रात्री नऊनंतर शहरातील कामगार कंपनीत नेणे किंवा कंपनीतील कामगार शहरात त्यांच्या घरी सोडण्यासाठी प्रशासन पासेस किंवा अन्य सुविधा देणार आहे, त्याबद्दल अद्याप मार्गदर्शक सूचना निघालेल्या नाहीत.
उद्योग संघटनांनी सर्व उद्योगांना कामगार, कर्मचारी, संचालक तसेच संबंधित व्यक्तींना मास्क लावणे, कंपनीत येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कंपनीत सुरक्षित अंतर राखणे, नियमित निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कंपनीत सदरील उपाययोजना यापूर्वीही राबविण्यात येत होत्या. गरज पडल्यास कंपनीतील कामगारांची पूर्वीप्रमाणे तपासणी केली जाईल. एकंदरीत उद्योगांच्या आरोग्याबरोबर समाजाचेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्व उद्योजक कटिबद्ध आहेत, असेही धूत यांंनी सांगितले.
चौकट.....
लॉकडाऊनबद्दल अफवा आणि भीती
शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर उद्योगांवर परिणाम होईल, अशा अफवा व भीती शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, वाळूज व पैठण रोड येथील औद्योगिक परिसरामध्ये पसरली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधून उद्योगांंना वगळल्यामुळे उद्योगांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले, तरी लॉकडाऊनमध्ये कोणत्या उपाययोजनांचे पालन करायचे, याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ‘सीएमआयए’ने केले आहे.