अनुराग पोवळे, नांदेड नांदेड आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते जवळपास ४० वर्षांपासूनचे होते़ भाजपातील कोणताही प्रश्न मग तो निवडीचा असो की पक्षांतर्गत वादाचा़ तो मांडला जायचा थेट गोपीनाथ मुंडे यांच्याच कोर्टात़ जनता युवा मोर्चाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर असलेल्या नांदेडमध्ये राजकीयदृष्ट्या संघटन वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचे नेहमीच प्रयत्न राहिले़ केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले़ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत असत़ मुंडे यांच्या नांदेडमधील सहकार्यांमध्ये कै़ भोजालाल गवळी, कै़ मदनमामा देशपांडे, माजी आमदार चंद्रकांत मस्की, नंदू कुलकर्णी, सुनील नेरलकर, लक्ष्मणराव गंजेवार, संभाजी पवार, डी़ बी़ पाटील, राम चौधरी, धनाजीराव देशमुख हे त्यांचे जुन्या काळातील सहकारी़ तर प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, अरूंधती पुरंदरे, डॉ़ शोभा वाघमारे, डॉ़ अजित गोपछडे, श्रावण भिलवंडे, दिलीपसिंघ सोडी यांच्याशीही त्यांनी पक्षबांधणीसाठी नेहमीच चर्चा केली़ मुंडे यांनी प्रारंभीच्या काळात मोटारसायकलवरूनच संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता़ संघटनावाढीचे ध्येय घेवून त्यांनी हा प्रवास केला़ आणीबाणीच्या काळात तरुंगवास भोगल्यानंतर १९७८ च्या निवडणुकीत नांदेडमधून चंद्रकांत मस्की यांचा विजय झाल्यानंतर मुंडे यांचे नेतृत्वगुण, त्यांच्यातील राजकीय कौशल्य पक्षापुढे आले होते़ तत्कालीन संघटनमंत्री वसंतराव भागवत यांनी मुंडे यांच्यासह प्रमोद महाजन यांच्यातील नेतृत्वगुणही जाणले होते़ त्याचआधारे मुंडे यांना १९८० मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत उभे करण्यात आले होते़ त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सेनेशी युती करायची की नाही याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली़ ही विचारणा त्यांनी स्वत: गावोगाव जावून केली होती़ नांदेडमध्ये आल्यानंतर ते विश्रामगृहावर थांबण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानीच मुक्कामी राहत़ यातून ते जिल्ह्यातील परिस्थिती समजून घेत असत़ त्यांच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता हा त्यांचाच होवून जायचा़ भारतीय जनता पार्टीतील गटबाजीने त्यांना नेहमीच चिंतीत केले होते़ त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचा नेहमीच संदेश दिला़ नांदेडमध्ये पक्षवाढीला चांगली संधी आहे अशी त्यांची नेहमीच धारणा होती़ पक्षबांधणीसाठी सुरुवातीला कार्यकर्ते सक्षम व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती़ सहकार क्षेत्रात उतरल्याशिवाय विकास नाही हे जाणताना त्यांनी वैद्यनाथ बँकेच्या शाखा मराठवाड्यात सुरू केल्या़ त्यात नांदेडचाही समावेश होता़ २०१२ मध्ये नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नांदेड जिल्हा आपण दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी मुंडे यांची नांदेडबाबतची महत्वाकांक्षा स्पष्ट झाली होती़ पक्षवाढीसाठी अनेकांना त्यांनी सोबत घेण्याचा प्रयत्न केला़ तसेच पक्ष सोडून जाणार्यांनाही त्यांनी पक्षात परत आणण्यासाठी प्रयत्न केले़ याच प्रयत्नात त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे राम चौधरी यांना पक्षात आणले़ तर मुखेडमध्ये राठोड बंधू आणि कंधार तालुक्यात भाई केशवराव धोंडगे यांच्याशी केलेली मैत्री हा त्याचाच भाग होता़ केवळ राजकीय बाबतीतच त्यांचा नांदेड जिल्ह्याशी संबंध आला असे नाही तर आपत्तीच्या काळातही त्यांनी जिल्ह्यातील जनतेला साथ देण्याचा प्रयत्न केला़ नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुंडे यांनी नांदेडचा दौरा केला होता़ तसेच गोदापरिक्रमांतर्गतही जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता़
दुचाकीवरून केली संघटनवाढ
By admin | Updated: June 4, 2014 00:45 IST