औरंगाबाद : सलीम कुरेशी हत्याकांडातील मुख्य आरोपी इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदाराने मोक्काच्या तीन गुन्ह्यांत वगळण्यात यावे, असा केलेला अर्ज मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी फेटाळला. माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी या खुनाचा तपास करून मुख्य आरोपी इम्रान मेहंदी यास अटक केली. अटकेनंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता एक एक करत चार गुन्हे उघडकीस आले. हे गुन्हे करताना इम्रान मेंहदीने गँगचा वापर केला होता. प्रत्येक गुन्हा करताना वेगळा गुन्हेगार गँगमध्ये सहभागी करून घेतला. इम्रान मेंहदीसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी संघटित गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार झोपडपट्टी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. इम्रान मेंहदी आणि गजानन म्हात्रे या दोघांनी मोक्का गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा विनंती करणारा अर्ज मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. जी. शेटे यांच्यासमोर सादर केला. गजानन म्हात्रे याने आपली पत्नी सिंधूबाई हिचा खून करण्यासाठी इम्रान मेंहदीच्या गँगला सुपारी दिली होती. सुपारी मिळाल्यानंतर म्हात्रेने जेवण केल्यानंतर शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. ती बेशुद्ध झाल्यावर इम्रान मेंहदीच्या गँगने तिला वाहनातून जटवाडा शिवारातील टेकडीवर नेऊन तिचा खून करून मृतदेह पुरला होता. मोक्काचे विशेष वकील राजेंद्र मुगदिया यांनी इम्रान मेंहदी आणि त्याच्या गँगविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचे सांगितले. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर मोक्का लावण्यात आला असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मोक्कातून वगळण्याचा अर्ज फेटाळला.
इम्रान मेहंदीचा मोक्कातून वगळण्याचा अर्ज फेटाळला
By admin | Updated: June 25, 2016 00:42 IST