औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या आवारात एक्स-रे विभागाच्या बाजूला मंगळवारी कॅरिबॅगमध्ये मृतावस्थेतील स्त्री जातीची जुळी अर्भके फेकलेली आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलगी नको या भावनेतून केलेल्या गर्भपाताचा हा प्रकार असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, घाटी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एक्स-रे आणि निर्जंतुकीकरण विभागाच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास साफसफाई करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास दोन कॅरिबॅग आढळून आल्या. या कॅरिबॅगमध्ये दोन अर्भके होती. ती दोन्ही स्त्री जातीची आणि जुळी होती. ही माहिती तातडीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात कळविण्यात आली. पोलिसांनी ही दोन्ही मृत अर्भके ताब्यात घेतली. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात मातेविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‘ती’ अर्भके घाटीतील नाहीत!यासंदर्भात घाटी रुग्णालयात विचारणा केली असता घटना उघडकीस आली. त्यापूर्वी घाटीतील प्रसुती विभागात एकूण ५२ अर्भके जन्माला आली होती. त्यापैकी ६ अर्भके मृत होती. विशेष म्हणजे मृत असलेली सहाही अर्भके ही पुरुष जातीची होती, असे घाटीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घाटी रुग्णालयात फेकून देण्यात आलेली ही दोन्ही अर्भके घाटीतील नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. घाटीतील या रेकॉर्डमुळे हा गर्भपाताचाच प्रकार असावा, या संशयाला बळकटी मिळत आहे. यापूर्वीही शहरात गर्भपाताचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत.दिशाभूल करण्यासाठी...सापडलेली स्त्री जातीची दोन्ही अर्भके घाटीत जन्मलेली नाहीत, हे घाटी रुग्णालयातील रेकॉर्डवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा गर्भपाताचा प्रकार असावा, असा संशय बळावला आहे. या बाळांच्या माता-पित्याने अवैधरीत्या गर्भनिदान चाचणी केली असावी आणि त्यात आपल्याला मुली होणार हे समजल्यानंतर कोठे तरी अवैधरीत्या गर्भपात केला व नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कॅरिबॅगमध्ये ही दोन्ही मृत अर्भके भरून ती घाटी रुग्णालयाच्या आवारात आणून फेकली असावीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दिशेने पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात पुन्हा अवैध गर्भपात?
By admin | Updated: July 17, 2014 01:36 IST