लातूर : औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या सहा मुलांनी लातूरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या अडचणीला पर्याय सुचविले आहेत. अंतिम वर्षासाठी त्यांनी सादर केलेल्या ‘ट्रॅफीक सोल्युशन्स आॅफ ग्लोरी आॅफ लातूर (शिवाजी चौक टू गंजगोलाई)’ या प्रकल्पाची महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी तर वाहवा केलीच पण शहराचे आमदार अमित देशमुख, महापौर अख्तर शेख यांनीही कौतुक करुन प्रोत्साहन दिले. आता लातूरचे पोलिस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना अंमलबजावणी हा प्रकल्प भेट देण्यात येणार आहे. सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयातील सहा तरुण. अविनाश जगताप, चारुदत्त गिरी, आकाश जगताप, सत्यम देवंकरे, कल्याण लातूरे, अमर चिंचनसुरे अशी त्या तरुणांची नावे. अंतिम वर्षासाठी यांना सहाजणात एक प्रोजेक्ट करायचा होता. निव्वळ महाविद्यालयाच्या कपाटात पडून राहणारा प्रोजेक्ट साकारण्यापेक्षा प्रत्यक्षात अंमलात येईल असा प्रोजेक्ट करायचा हा चंग मुलांनी बांधला. त्यांची शोधक नजर जेव्हा प्रकल्पासाठी विषय शोधत होती तेव्हा त्यांना लातूर शहरात विषय सापडला. दररोज कॉलेजला निघताना घरातून शहराबाहेर पडताना जी वाहतुकीची समस्या त्यांना दिसली तीच त्यांनी प्रकल्पासाठी निवडली. जेव्हा त्यांनी महाविद्यालयातील स्थापत्यशाखा विभागप्रमुख प्रा. रेवणसिध्द बुक्का व मार्गदर्शक प्रा. प्रमोद मंत्री, आणि प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांच्या पुढे हा विषय मांडला तेव्हा त्यांनीही कौतुक केले. मुलांनी एक महिना दररोज शिवाजी चौक ते गंजगोलाई जाऊन येऊन हा प्रकल्प पूर्ण केला. (प्रतिनिधी)मुलांच्या शोधक नजरेतून काही जाणवलेल्या गोष्टी आहेत. त्या मुलभूत आहेत. ते म्हणतात, लातूर शहरात राजीव गांधी चौक ते एमआयटी कॉलेज, पीव्हीआर चौक ते गंजगोलाई हे दोनच मुख्य रस्ते वापरात आहेत. त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा वापर झाला पाहीजे. यात वाहतूक शाखेने नियोजन करुन ते अंमलात आणले पाहीजे. ‘जड वाहनास प्रवेश बंद’ असे लिहूनही अंमलबजावणी नाही. टू व्हीलर आणि फोर व्हिलरसाठी वेगळे ट्रॅक हवेत. पार्र्कींगला मनपाच्या जागा कमी आहेत. भविष्यात ही सर्वात मोठी अडचण आहे. लोक रहदारीचे नियम पाळत नाहीत.
लातूरच्या ‘ट्रॅफिक’वर ‘विश्वेश्वरय्या’च्या मुलांचे आयडियल पर्याय...
By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST