ते प्रख्यात लेखक, कवी ना.तु. पोघे लिखित ‘इरवाड’ आत्मकथनाचे मसापच्या सभागृहात प्रकाशन प्रसंगी बोलत होते. डॉ.दादा गोरे अध्यक्षस्थानी होते.
सबनीस म्हणाले, इरवाड आत्मकथन आहे की नाही, हे रसिक-वाचक ठरवतील. इरवाड हा मायलेकरांमधला संवाद आहे. आत्मकथनांमुळे दलित चळवळीची कोंडी झाली का, पुढे विषयच सापडू नये, ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न ना. तु. पोघे करताना दिसतात.
प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ.संजय मून व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा.कैलास अंभुरे यांनी इरवाडवर भाष्य केले.
इरवाड हे आत्मकथन नाही. फार तर हे आत्मवृत्त आहे. या लालित्यपूर्ण आठवणी आहेत. आठवणींचा हा गहिवर म्हणजे इरवाड, यात प्रांजळपणा व संयतता आहे व जीवन चिंतनही आहे. ग्रामीण बोलीभाषेचा ऐवज आहे, इरवाड म्हणजे गारुड्याची थैली होय, असे डॉ.अंभुरे म्हणाले.
चळवळीच्या आकृती बंधात साहित्य अडकून पडले आहे. या साहित्याचा समारोप भारतीय साहित्यात होणार आहे. पारंपरिक आत्मकथनापलीकडचं हे आत्मकथन आहे. यात लेखक नायक नाही, तर गावगाडाच नायक आहे, असे विवेचन डॉ.संजय मून यांनी केले.
पोघे म्हणाले, मला आज दिवंगत गंगाधर पानतावणे, दिनकर बोरीकर, ल.बा.रायमाने, सुशीला मूल-जाधव, अविनाश डोळस यांची आठवण येत आहे. साहित्याच्या ललित गद्य पद्धतीने मी इरवाड लिहिले आहे. श्रमिकांच्या व महिलांच्या प्रतिष्ठेला मी यात महत्त्व दिले आहे. प्रेमाच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असे माझे मत आहे. मी गरिबी पाहिलेली नाही. श्रीमंतीतच जगलो. त्यामुळे हे दलित माणसाचं आत्मकथन वाटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ.दादा गोरे यांचे स्वागत डॉ.दासू वैद्य यांनी श्रीपाल सबनीस यांचे स्वागत के.ए. अतकरे यांनी केले. ना.तु. पोघे यांचे स्वागत श्रीपाल सबनीस यांनी केले. ललिता श्रीपाल सबनीस यांचे स्वागत डॉ.अरुणा लोखंडे यांनी केले. डॉ.संदीप भारुडे व प्रीती भारूडे यांनीही पाहुण्यांचे स्वागत केले. हास्यकवी प्रा.डॉ.विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती भारुडे यांनी आभार मानले.