पारध : भोकरदन तालुक्यातील वडोदतांगडा येथे राऊबा पाटीलबा तांगडे हे कुटुंबियांसह घराला कुलूप लावून शेतावर कामासाठी गेले. या दरम्यान चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील रोख दीड लाख रूपये व ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले. हा प्रकार २४ जून रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या सुमारास घडला. राऊबा पाटील हे काल दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात मशागतीच्या कामासाठी कुटुंबियांसह गेले होते. त्यासाठी घराला कुलूप लावले. त्यांचे शेत गावातच घरापासून अगदी जवळ आहे. मात्र चोरी झाल्याची खबर एकाही व्यक्तीला लागली नाही. एवढेच नव्हे तर शेजाऱ्यांनाही चोरीचा थांगपत्ता लागला नाही. ग्रामीण भागातही दिवसाढवळ्या चोऱ्या वाढत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. दुपारी १ वाजता तांगडे कुटुंबिय घराला कुलूप लावून शेतात गेल्यानंतर चोरट्यांनी कुलूप व कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेली दीड लाखाची रोकड व सोन्याच्या पुतळ्या ज्याची किंमती ५० हजार रुपये आहे, असे एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. तांगडे कुटुंबिय दुपारी ४ वाजता घरी परतले. त्यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सुरूवातीला त्यांना एखादे जनावर घरात घुसल्याचा संशय आला. मात्र काही वेळाने कपाट फुटलेले दिसल्याने घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पेरणी व शेतीच्या कामासाठी आणून ठेवलेले दीड लाख रूपये व सोन्याचे दागिने पळवून नेल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पारध पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. सहायक निरीक्षक किरण बिडवे यांनी पारध पोलिस ठाण्यात चोरीची नोंद घेतली. तांगडे यांच्या निवासस्थानी बिडवे यांच्यासह प्रशांत उबाळे, प्रकाश सिनकर, भगतसिंग राजपूत आदींनी भेट देऊन माहिती घेतली. (प्रतिनिधी)
पेरणीसाठी ठेवलेली दीड लाखाची रोकड पळविली
By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST