कळंब : सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणार्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेमधून कळंब तालुक्यातील २४ हजार ८९६ विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४९ हजार विविध विषयातील पाठ्यपुस्तकाचे गटशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत वितरण करण्यात आले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदानीत असलेल्या १७७ शाळेमधील विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ मिळणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, नगर परिषदेच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुसुचित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शालेय पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. आर्थिक विवंचनेमुळे पाठ्यपुस्तकापासून कोणताही शालेय विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानामार्फत बालभारतीने प्रकाशित केलेली ही पाठ्यपुस्तके मोफत वाटप करण्यात येतात. कळंब तालुक्यातील इयत्ता १ ली व २ री च्या प्रत्येकी ३१०३, इयत्ता तिसरीच्या ३१८७, इयत्ता चौथीच्या ३०५१, इयत्ता पाचवीच्या ३१५९, सहावीच्या ३३६७, इयत्ता सातवीच्या ३१५७ तर आठवीच्या २५६९ शालेय विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके प्रत्येक केंद्रनिहाय पोहोच करण्यात आली आहेत. तालुक्यातील २४८९६ विद्यार्थ्यांना १ लाख ४८ हजार ६६० पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १४१ शाळा, नगर परिषदेच्या २ शाळा, खाजगी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित असलेल्या ३४ अशा १७७ शाळांना या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये बालभारती, महाइंग्लिश, परिसर अभ्यास भाग १, परिसर अभ्यास भाग २, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील १७७ शाळातील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४८ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, त्याचे जवळपास सर्व शाळांना वितरण झाले आहे. फक्त तिसरीचे परिसर अभ्यास व चौथीचे परिसर अभ्यास भाग १ प्राप्त होणे बाकी आहे. ही पुस्तकेही लवकरच मिळतील असे गटसमन्वयक संजय कुंभार यांनी सांगितले. (वार्ताहर) विनाअनुदानित शाळा वंचित तालुक्यात अनेक शाळा शासनमान्य परंतु, विना अनुदानित आहेत. शिवाय खाजगी इंग्रजी शाळेची संख्याही मोठी आहे. या शाळांमध्ये अनेक गोरगरीब परिवारातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु एकीकडे शासनाचे अनुदान उचलणार्या शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जात असताना ज्या शाळांना खरोखरच शासनाच्या मदतीची गरज आहे. अशा विनाअनुदानित शाळांना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे सर्व शिक्षा अभियानने अशा शाळांतील विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. ५४ हजार स्वाध्याय पुस्तिका शाळामधील अध्ययन व अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर अभ्यासक्रमाची उजळणी तसेच गृहपाठ करावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नावलीवर आधारीत स्वाध्यायमाला मोफत देण्यात येतात. २०१४ साठी कळंब गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ६ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ५४९०० स्वाध्याय पुस्तिका प्राप्त झाल्या आहेत.
दीड लाख पुस्तकांचे वाटप
By admin | Updated: June 5, 2014 00:47 IST