बंडू खांडेकर, दिंद्रूडगारपिटीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच वादळ-वाऱ्यात सापडला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेकांची घरे पडली असून, संसार उघड्यावर आले आहेत. ‘सांगा आम्ही, जगायचं कसं’ अशी आर्त हाक संसार उघड्यावर आलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.दिंद्रूड परिसरातील मोठीवाडी, हिंगणी, मोहखेड शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या सुमारे ६५ शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात शेतातील पिकांसह घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पिंगलखोरी, होनमने टेकडी, पळसपट्टी, वाघजई शिवाराकडील शेतकरी आदी भागात या वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. शेतातील आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने वस्तीवरील गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. ज्या घरामध्ये नागरिक बसले होते त्यांनाही या वादळाचा तडाखा सहन करावा लागला आहे.शेतातील ऊस, उन्हाळी बाजरी, मका, आंबा, मोसंबी, डाळिंब, लिंबोणी या सारखे पिके व फळबागांचेही नुकसान झाल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील महिन्यातच झालेल्या गारपिटीत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच पुन्हा वादळाच्या मारपिटीत सापडला आहे. आता यातून सावरणे या शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. गोरखनाथ सोळंके, मीरा चोरमले, विश्वांभर माने आदी नागरिक या वादळी वाऱ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी घरामध्ये बसले असता वाऱ्याने घरावरील पत्रे उडून अंगावर पडल्याने जखमी झाले आहेत. तसेच प्रकाश सोळंके, साळुजी व्हरकटे, बब्रुवान सोळंके, काशीनाथ सोळंके, मुंजा होनमने या शेतकऱ्यांच्याही घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. घटनास्थळी नायब तहसीलदार गेंदले यांनी भेट दिली आहे. मंडळ अधिकारी रोहिदास चव्हाण, तलाठी एकनाथ गोरे बोलताना म्हणाले, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.
विस्कटलेला संसार घेऊन आम्ही जगायचं कसं...!
By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST