औरंगाबाद : पंचायत समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे सभागृहाबाहेर पडलेल्या संग्रामच्या तालुका समन्वयकासह डेटा आॅपरेटर्सना सदस्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. डेटा आॅपरेटर्सनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर सदस्यही त्यांच्या पाठोपाठ ठाण्यात पोहोचले व आॅपरेटर्सकडे दिलगिरी व्यक्त केल्याने प्रकरण मिटले. सूत्रांनी सांगितले की, तालुका पंचायत समितीची मंगळवारी सर्वसाधारण सभा होती. या सभेत संग्रामअंतर्गत डेटा आॅपरेटर्सची पदे भरताना पैसे मागितले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. बैठकीला उपस्थित संग्रामचे तालुका समन्वयक राजेंद्र कवाळे यांनी हा आरोप फेटाळून लावत डेटा आॅपरेटर्सच्या नियुक्त्या तालुका स्तरावरून होत नाहीत, तर त्या वरिष्ठ पातळीवरून होतात, असे स्पष्ट केले; परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सदस्यांनी ‘तू आम्हाला शिकवू नकोस’ अशा शब्दांत त्यांची निर्भर्त्सना केली. त्यामुळे सभागृहात शाब्दिक बाचाबाची होऊन कवाळे हे सभागृह सोडून बाहेर आले. शिवसेनेचे सदस्य रघुनाथ वाघमोडे यांचे समर्थक कार्यकर्ते यावेळी बाहेर उभे होते. त्यांना सभागृहातील घटनेची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी कवाळे, संतोष पवार, रमेश घोगरे यांना बेदम मारहाण केली. यात या तिघांना जबर मुका मार लागला. कवाळे, घोगरे व पवार यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. औरंगाबाद पंचायत समितीचे सभापती सुनील हरणे, रघुनाथ वाघमोडे व इतर सर्वच सदस्य ठाण्यात हजर झाले. तेथे दोन्ही गटांत समेट झाला. सदस्यांनी पोलीस अधिकाऱ्यासमक्ष दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे तिन्ही आॅपरेटर्सनी तक्रार मागे घेतली.
‘संग्राम’च्या तालुका समन्वयकास मारहाण, नंतर दिलगिरी व्यक्त
By admin | Updated: December 24, 2014 01:04 IST