हिंगोली : मागील काही दिवसांपासून गायब झालेली थंडीची लाट पुन्हा अवतरली आहे. हिंगोली जिल्ह्याचे दिवसाचे तापमान २६ अंश सेल्सिअस असले तरीही हवेत असलेल्या गारव्यामुळे उन्हाची तीव्रता अजिबात जाणवत नाही. रात्रीचे तापमान १२ सेल्सिअसपेक्षाही खाली उतरत आहे. यावर्षी सुरुवातीचे काही दिवस वगळले तर थंडी जाणवतच नव्हती. त्याचा पीक परिस्थितीवरही मोठा परिणाम झाला होता. गहू तर अवेळी निसवल्याने मोठे नुकसान झाले. गव्हाची चांगल्याप्रकारे वाढही झालेली नसल्याने फुटभर गव्हाला तोरंब्याही कमी आकाराच्याच आहेत. तसेच मेथी, पेरू यांचेही नुकसान झाले. थंडी नसल्याने तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला. अळीच्या हल्ल्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले. बुधवारी रात्री थंडीची लाट आल्यासारखी थंडी जाणवत होती. गुरूवारी तर दिवसाही थंडी जाणवत असल्याने अनेकांनी दिवसभर उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसून येत होते. साधारण ढगाळ वातावरणात उन्हाची तीव्रताही जाणवत नव्हती. त्याचबरोबर सकाळच्या वेळी धुके पडल्याचे जाणवत होते. थंडीच्या कडाक्यामुळे आज शेकोट्याही मोठ्या प्रमाणात पेटल्याचे दिसून येत होते. हिंगोली शहरातील विविध भागात रस्त्यावर उबदार कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मात्र त्या ठिकाणी ग्राहक फिरकतही नव्हते. गुरूवारी दुपारी मात्र अशा दुकांनावर गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळत होते. कोणतीही तयारी न करता आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना या दुकानांमुळे स्वेटर, मफलर, शॉल खरेदीची आठवण झाली. रुग्णसंख्या वाढली : पिकांना फायदा अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने रुग्णसंख्याही वाढत आहे. अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांत या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. लहान मुले व वृद्धांना थंडीचा कडाका सहन होत नसल्याने त्यांच्यात आजारी पडण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. या थंडीमुळे पिकांना काही प्रमाणात फायदा होणार आहे. कडक उन्हामुळे काही ठिकाणी हरभऱ्याला फटका बसत असल्याचे दिसून येत होते. त्याला फायदा होईल. वऱ्हाडी गारठले एकतर शासकीय सुट्या व मोठ्या लग्नतिथी लागोपाठ आल्या आहेत. अशा मंगलप्रसंगी उपस्थितीही टाळता येत नाही. त्यामुळे विविध भागात वऱ्हाडी मंडळींना गारठा सहन करीत प्रवास करावा लागत आहे.
थंडीच्या लाटेत हिंगोली गारठली
By admin | Updated: December 25, 2015 00:01 IST