औरंगाबाद : धावत्या रेल्वेत दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी चोरट्यांनी ‘हिसका’ मारल्याने रेल्वेतून खाली पडून एक प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनजवळच घडलीश्याम गजानन माहुरे (२२, रा. केळवद, चिखली, बुलढाणा) असे जखमी प्रवाशाचे नाव असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, माहुरे हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये नोकरी करतो. आपल्या गावी जाण्यासाठी नाशिकहून तपोवन रेल्वेत बसला. औरंगाबादमार्गे जालन्याला जाऊन तेथून तो बसने गावी जाणार होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास तपोवन औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पोहोचली. येथे काही वेळ थांबल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली. स्टेशन ओलांडून रेल्वे छोटा मुरलीधरनगर जवळ पोहोचली, त्यावेळी माहुरे रेल्वेच्या दरवाजातच उभा होता. त्याचा मोबाईल हातात होता. या ठिकाणी धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावणारी टोळी खाली उभीच असते. दुपारीही ही टोळी तयारीने बसलेली होती. रेल्वे येताच या आरोपींनी माहुरेच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी जोरदार ‘हिसका’ मारला. त्या झटक्यामुळे मोबाईलबरोबरच माहुरेही धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. तेव्हा त्या लुटारूंनी त्याचा मोबाईल व सात हजार रुपये काढले आणि धूम ठोकली. दहा मिनिटे माहुरे गंभीर जखमी अवस्थेत तेथेच विव्हळत पडला. कुणी तरी एक जण जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला दिली. लगेच रुग्णवाहिकेने माहुरेला उचलून घाटीत आणले. तो शुद्धीवर आल्यानंतर लूटमारीचा हा प्रकार स्पष्ट झाला.
चोरट्यांचा ‘हिसका’; प्रवाशाच्या जिवावर...
By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST