औरंगाबाद: शहरात ५ मेपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
वाढत्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक करून नागरिकाना कोरोनापासून संरक्षण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केली होती. तत्पूर्वी त्यांनी शाळा, कॉलेज आणि औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केली होती. त्यांच्या कार्यकाळात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या बदलीनंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी शहरातील ९० टक्के दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे बंद केले होते. आज वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी आदेश काढून शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले. ५ मेपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त वानखेडे यांनी सांगितले.
चौकट...
पाचशे रुपये दंड भरावा लागेल...
दुचाकीचालक आणि चालकामागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालणे बंधनकारक.
विना हेल्मेट दुचाकीचालकाला पाचशे रुपये दंड द्यावा लागेल.
दुचाकीवरील दोन प्रवासी विना हेल्मेट असतील, तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल.
कोट
हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावे
रस्ते अपघातामधील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट एक प्रभावी साधन आहे. बुधवारपासून शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होत आहे. दुचाकीस्वार नागरिकांनी हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावे.
- सुरेश वानखेडे, सहायक आयुक्त, वाहतूक विभाग.