बीड : इवल्या पावलांनी शाळेत पहिले पाऊल ठेवले़़़ नवी अंगणवाडी़़़ नवीन इमारत़़़ नवे सवंगडी अन् नवे गुरुजऩ़़ या नव्या नवलाईत सुरुवातीला लेकरं कावरले़़ बावरले; पण आता हळूहळू ती रमायला लागलीत़ सकाळी नऊ वाजेपर्यंत अंथरूणात खुशाल लोळणारे हे चिमुकले आता सात वाजताच सुटाबुटात ‘रेडी’ असतात़ न पेलेल इतके ओझे असलेले दफ्तर पाठीवर घेऊन अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या बालकांची जशी स्थिती तशीच दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची़ सकाळी शाळा, दुपारी शिकवणी अन् संध्याकाळी अभ्यास़़़ थोडी फुरसत मिळालीच तर टीव्ही़़़ सतत ‘बिझी’ असलेल्या विद्यार्थ्यांना खेळ अन् व्यायामासाठी खूपच कमी वेळ दिला जातो. पालकांच्या अपेक्षा पेलवताना विद्यार्थ्यांची अक्षरश: तारांबळ उडते. पालकांना विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला, त्याच्या शिक्षकांना भेटायलाही वेळ नाही. पाल्याला घेऊन फिरायला जाणारे पालक तर अगदीच कमी आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात ‘बिझी’ ठेवूनही बहुतांश पालक त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर समाधानी नाहीत. एकंदरीत काय तर पालकांच्या अपेक्षेचे ओझे विद्यार्थ्यांना जड होऊन बसले आहे. ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला.सर्वेक्षणात ‘लोकमत’ ने शंभर पालकांकडून एक प्रश्नावली भरुन घेतली. त्यात २० पालकांची पाल्ये बालवाडीत, ३६ पालकांची पाल्ये प्राथमिक तर ४४ पालकांची पाल्ये माध्यमिकमध्ये शिक्षण घेतात. पाल्य शाळेत जाताना प्रसन्न मुद्रेने जातो का? असे विचारले तेव्हा ५२ जणांनी होय, ३२ जणांनी कधीकधी जर १६ जणांनी नाही, असे उत्तर दिले. पाल्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी ६० टक्के पालकांना वेळच नाही. केवळ २८ टक्के पालके विद्यार्थ्यांशी शाळेबाबत हितगुज करतात तर १२ टक्के इतकेच पालक शिक्षकांशी चर्चा करतात. ५६ टक्के पालक दोन तासांपेक्षा जास्त वेळ आपल्या पाल्यास टीव्हीपुढे बसू देतात. तर १२ टक्के पालक असे आहेत जे पाल्यांना टीव्ही पाहूच देत नाहीत. शाळेतून घरी आल्यावर अभ्यास व शिकवणीसाठी ८८ टक्के मुलांचा चार तास वेळ जातो. ८ टक्के विद्यार्थी सहा तास देतात तर आठ तासापेक्षा जास्तवेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ केवळ आहे. पाल्याला व्यायाम व खेळासाठी ८४ टक्के पालक दोन तास वेळ देतात. १६ टक्के पालक तीन तास वेळ देतात. पाल्याला घेऊन फिरायला जायला ६८ टक्के पालकांना वेळ नाही. १२ टक्के पालक महिन्यातून दोनदा पिकनिकला जातात. तर २० टक्के पालक एकदा जातात. पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर साठ टक्के पालक नाराज आहेत. ४० टक्के पालकांनी समाधान व्यक्त केले. ६४ टक्के पालकांची मुले महिन्यातून दोनदा आजारी पडतात. तर १२ टक्के पालकांच्या मते पाल्ये दोनवेळ आजारी असतात. २४ टक्के पालकांची मुले एकदा आजारी असतात. पालकांनी विद्यार्थी व शाळेकडून अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत़तणावांपासून दूर ठेवा!विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्यांच्या आवडी, निवडी जपल्याच पाहिजेत. अनेकदा मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुले अपयशी होण्याची भीती असते. विद्यार्थ्यांना तणावांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. - डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारीअभ्यासाला खेळाची जोड हवीचविद्यार्थ्यांना जशी अभ्यासाची गरज असते तशीच खेळाची देखील. घरात बसून संगणकांशी खेळणाऱ्या मुलांमध्ये आजारांचे प्रमाण मोठे आहे. खेळामुळे मन, मेंदू व मनगट सशक्त होते. त्यामुळे अभ्यासोबतच मुले मैदानावरही गेली पाहिजेत. आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा़- डॉ. रमेश सोनवणे, बालरोगतज्ज्ञकाय म्हणतात पालक ? पालकांच्या मते मुले अभ्यासात गुंतून राहिल्याने त्यांना चांगल्या सवयी लागतात. पाल्यांनी पालकांच्या सूचनेप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. आपल्या अडचणी आवश्य व्यक्त केल्या पाहिजेत. काही पालक म्हणाले, शिक्षणासाठी भरमसाठ फी मोजतो मग शिक्षक व शिकवणीवाल्यांनीच पालकांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे.उच्चशिक्षित मंडळींपासून ते व्यापारी, शेतकरी व अगदी मोलमजुरी करुन उपजीविका भागविणाऱ्या पाल्यांची मते नोंदविण्यात आली. सर्वांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगविली आहेत. स्वप्ने साकार करण्यासाठी विद्यार्थी, पालकांची कठोर मेहनतही सुरु आहे; पण पालकांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली विद्यार्थी वावरत आहेत. त्यांना तणावमुक्त शिक्षण देण्याची तर गरज आहेच. शिवाय केवळ पुस्तकात मुंडके खुपसवून बसविण्याऐवजी मैदानी खेळातही त्यांना कौशल्य विकसीत करण्याची संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक बनले आहे. त्याशिवाय या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याचा निभाव लागणार नाही...लोकमतने पालकांकडून प्रश्नावली भरुन घेतली ती अशी़़़१) आपला पाल्य कुठल्या वर्गात शिकतो?२) पाल्य शाळेत जाताना प्रसन्न मुद्रेने जातो का?३) पाल्यात शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी आपण काय प्रयत्न केले?४) आपल्या पाल्याला टीव्ही पाहण्यासाठी किती वेळ देता?५) पाल्याचा अभ्यास व शिकवणीत किती वेळ जातो?६) पाल्याला व्यायाम, खेळासाठी किती वेळ देता?७) पाल्याला घेऊन पिकनिकला महिन्यातून किती वेळ जाता?८) पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी समाधानी आहात का?९) आपला पाल्य महिन्यातून किती वेळा आजारी पडतो?या नऊ प्रश्नांचा समावेश होता. सर्व प्रश्नांना तीन पर्याय दिले होते. याशिवाय पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी पालकांची मतेही जाणून घेतली.
जड झाले ओझे अ पे क्षां चे
By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST