औरंगाबाद : सात मजली हास्यकल्लोळ काय असते याची अनुभूती सखींना सोमवार, दि.२२ डिसेंबर रोजी येणार आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘हसवा फसवी’ या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाटकाद्वारे सहा बहुरंगी, बहुढंगी पात्रे अभिनेता पुष्कर श्रोत्री सादर करणार आहे. लोकप्रिय नाट्यसंस्था जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित हे नाटक आहे. दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेला ‘हसवा फसवी’ हा धमाल उडविणारा नाट्यप्रयोग लोकमत लॉनवरील रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे.या नाटकातील अफालातून सहा व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या आहेत. ‘हसवा फसवी’मध्ये कथानकाची जोड आहे आणि त्या कथानकातून या व्यतिरेखा आपणालाभेटतात. पुष्कर श्रोत्री या भूमिका तितक्याच दमदारपणे साकारत आहे. त्याला रसिकांचा तितकाच जोरदार प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण नाटकभर हसत राहावे आनंदाने, असा अनुभव सखींना नक्की येईल. सोबत सतीश जोशी, वैखरी पाठक आदींची भूमिका असणार आहे. सायं. ५.३० वा. नाट्यप्रयोगाला सुरुवात होणारआहे. लोकमत भवनच्या पाठीमागच्या गेटने प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, येताना सखींनी न विसरता सखी मंचचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या रंगतदार, विनोदी, खुमासदार प्रयोगाचा आनंद सखींनी आवर्जून लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘हसवा फसवी’ विनोदी नाटक उद्या
By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST