औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेने मंगळवारी बीड बायपासवरील चावडा कॉम्प्लेक्ससमोरील मोदी टॉवरच्या एका मजल्यावर हातोडा चालवला. २६ कामांना ‘जैसे थे’चे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर के.के. पटेल इमारतीचा वरचा मजला स्वत: बिल्डरने पाडणे सुरू केले. सातारा- देवळाई नगर परिषद उदयास आली अन् आता ‘अच्छे दिन आले’ असे सातारा- देवळाईवासीयांना वाटले. अल्पावधीत रिकाम्या प्लॉटवर झपाट्याने जी प्लस ५ मजल्यापर्यंत इमारती उभा राहिल्या आहेत. नगर परिषदेने नोटिसा देऊन अतिरिक्त बांधकाम काढून घेण्याचे कळविले असतानाही काय होणार, असा गैरसमज करून घेऊन अजूनही राजरोसपणे कामे सुरू आहेत. नगर परिषदेने पाडापाडीचे काम सुरू केले अन् बिल्डर लॉबी दचकली, ज्यांनी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांचे नेमके काय होणार या धास्तीखाली अनेकांनी बिल्डरकडे तगादा सुरू ठेवला आहे; परंतु कर्जबाजारी होऊन घेतलेल्या घराचे हातोडा व ब्रेकरने तुकडे करून टाकले. ब्रेकरच्या हादऱ्याने इमारतींनाही तडे गेले असून पाडापाडी केल्यानंतर यंत्रणेचा खर्चही इमारतधारकांकडून वसूल केला जाणार आहे. अशा विविध अटींमुळे गुंतवणूकधारकांची कंबर खचली आहे. नागपूर व मुंबईत मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी शिष्टमंडळ डेरेदाखल झालेले आहे. मात्र, त्यांच्या हाती फारसे यश आले नसले तरी ते शासनाकडे आशावादी भूमिकेत बसलेले आहेत. गट नं. १४० मधील श्रावण मोदी यांच्या जी प्लस तीन इमारतीचा वरचा एक मजला अतिक्रमण हटाव पथकाने सकाळी खिळखिळा केला.
मोदी टॉवरवर हातोडा
By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST