परभणी: राज्यभर गाजत असलेल्या केबीसी गैरव्यवहारप्रकरणी पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे अर्धे गाव केबीसीच्या मोहात पडल्याचे समोर येत आहे. या गावातील गुंतवणूकदारांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केबीसीच्या संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली.नाशिक येथील केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, केबीसी क्लब अॅन्ड रिसोर्ट प्रा. लि. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक गुंतवणूदारांची फसवणूक झाली आहे. जिल्ह्यामध्ये केबीसी गुंतवणूकदारांचे मोठे जाळे आहे. यात कष्टकरी, शेतकऱ्यापासून ते नोकरदार, व्यापारी, उद्योजक आणि उच्च शिक्षितांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास येत आहे. केबीसीमध्ये फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाभर या विषयी चर्चा सुरु आहे. गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील जवळपास ८० नागरिकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन फसवणुकीची माहिती त्यांना दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन दिले आहे. निवेदनात केबीसी कंपनीचे चेअरमन भाऊसाहेब छबू चव्हाण, संचालक आरती भाऊसाहेब चव्हाण, व्यवस्थापक बापुसाहेब छबू चव्हाण, नानासाहेब छबू चव्हाण, सोपान ऊर्फ रमेश चव्हाण, राजाराम शिंदे, बाजीराव शिंदे, संजय वामन जगताप, सुनिता प्रकाश दातरगे, भारती शिलेदार, विशाल पाटील, संदीप जगदाळे, छबू चव्हाण, कौशल्या संजय जगताप, पंकज राजाराम शिंदे, सागर पाटील या सर्वांनी दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांकडून रकमा उचलून रक्कमांची पोहच म्हणून पॉर्इंट, व्हाऊचर आदी देऊन या रक्कमांचा वापर स्वत:साठी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. केबीसी कंपनीने ग्राहकांकडून विविध रक्कमांचे पॅकेजेस सेमीनार आणि एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात आले. परंतु, कंपनीमध्ये रक्कमा जमा करुन नोंदणीकृत ग्राहक म्हणून गुंतवणूकदारांना रक्कम दिल्याची पावती न देता कस्टमर कॉपी देऊन हीच पैशाची पोहच आहे, असे दाखविले. परंतु, या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याचे आता उघड झाले असून आम्ही सर्व गुंतवणूकदार म्हणून कार्यरत होतो. कंपनीने कुठलाही प्रकारचा अधिकृत व्यक्ती नेमलेला नाही. त्यामुळे या कंपनीने आमची घोर फसवणूक केली असून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देऊळगाव दुधाटे येथील ८० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एक लाख रुपयांसाठी एक पॉर्इंट१७ हजार २०० रुपयांवर ठरवून दिलेल्या तारखांना ३० महिन्यांच्या आत ५१ हजार रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले होते. या कंपनीमध्ये नाशिक येथे जाऊन कस्टमर कॉपी नावाची पैशांची पोहच दिल्यानंतर कंपनीचे संचालक व इतर लोक चेक, व्हाऊचर आणि सर्टिफिकेट किंवा हॉलिडे पॅकेजचे व्हाऊचर देत. त्यानंतर या रक्कमा पूर्तता करण्याची वेळ आल्यावर ती कागदपत्रे घेऊन त्या बदल्यात केबीसी मल्टीट्रेड प्रा.लि. चे व्हाऊचर ज्यावर नंबर आहे, अशा रक्कमेस पॉर्इंट असे नाव देऊन सदर रक्कमेचे टोकन दिले जात होते. पॉर्इंटमध्ये २.५६ असे लिहिले असले तर त्याचा अर्थ दोन लाख ५६ हजार असा होतो. अशाप्रकारे लाख या शब्दाला कंपनीतर्फे पॉर्इंट असे लिहून दिले जायचे. सर्व काही बहानाएका ग्राहकाने दुसरा ग्राहक कंपनीला जोडल्यास त्याच्या कामाचा मोबदला म्हणून एक गिफ्ट कंपनी देईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीचे ग्राहक म्हणून नोंदणी केली. परंतु, अर्जदार व गुंतवणूकदारांना कोणतेही अधिकृत मेंबरशीपबाबत पत्र कंपनीने दिले नाही व मेंबरशीप देण्याचा खोटा बहाना केला असल्याचे लक्षात येत आहे. अशी आहेत बँक खातीगुंतवणूकदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत कंपनीच्या ज्या बँक खात्यावर पैसे जमा केले त्या खात्याचे क्रमांकही दिले आहेत. त्यात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र या बँकेच्या प्रत्येकी दोन खात्यावर नगदी स्वरुपात रक्कम भरल्याचे नमूद केले आहे. या खाते क्रमांकाची चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी या निवेदनात केली आहे. तीन वर्षांपासून गुंतवणूक केबीसी या कंपनीमध्ये गोरगरीब, शेतकरी, मजूर आदी गुंतवणूकदारांनी कष्टाची कमाई गुंतविली. २०१० पासून या कंपनीत गुंतवणूक केली जात होती. सुरुवातीला १३ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक झाल्यानंतर त्याचा परतावा मिळाली की रक्कम वाढत गेली आणि गुंतवणूकही वाढत गेली. १३ हजार ५००, १७ हजार २००, ८६ हजार, २ लाख ३६ हजार , ४ लाख ३६ हजार अशी टप्प्याटप्याने गुंतवणूक करीत मोठ्या रक्कमेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. देऊळगाव दुधाटे या एकाच गावात जवळपास १ कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी गुंतवणूकदार हवालदिल झाला असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ग्राहकांना विविध पॅकेजेसची माहिती एसएमएसद्वारे दिली जात असल्याने ग्राहकांची ओढ वाढतच होती.
अर्धे गाव केबीसीच्या मोहात
By admin | Updated: July 22, 2014 00:22 IST