रोहिलागड: अंबड तालुक्यातील रोहिलागड गावातील सिंगलफेज योजनेची दोन रोहित्रे जळाल्याने मागील १५ दिवसांपासून अर्धेगाव अंधारात आहे. ग्रामस्थांनी दुरूस्तीची मागणी केल्यानंतर थकबाकीचे कारण दाखवून महावितरणकडून नवीन रोहित्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अंबड तालुक्यातील रोहिलागड हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. गावात सिंगलफेज योजना आहे. यासाठी चार ठिकाणी रोहित्रे बसविण्यात आलेली आहेत. पैकी दोन रोहित्रे मागील १५ दिवसांपासून जळालेली आहेत. ही रोहित्रे दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी स्वयंखर्चांने जालना येथील महावितरणच्या कार्यालयात जमा केलेले आहे. मात्र अद्याप रोहित्राची दुरूस्ती झालेली नाही. किंवा नवीन रोहित्रे देखील ग्रामस्थांना दिलेली नाहीत. रोहित्राच्या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरणच्या अंबड तालुक्यातील जामखेड येथील उपकेंद्रात व जालना येथील महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. ग्रामस्थांना वीज थकबाकीचे कारण दाखवण्यात येत आहे. थकबाकी भरा नंतर रोहित्र देऊ असे महावितरण करून सांगण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. महावितरणच्या या धोरणामुळे गावात मागील पंधरा दिवसांपासून अंधार असल्याने ग्रामस्थ महावितरण विरू द्ध संताप व्यक्त करत आहे. (वार्ताहर)खांबाला रोहित्राची प्रतिक्षा मागील पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी महावितरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील जळालेले दोन्ही रोहित्र खांबावरून काढले. स्वखर्चाने खाजगी वाहन करून ते जालन्याला नेले. मात्र अद्यापपर्यंत ते रोहित्र दुरूस्त करून मिळालेले नाही. त्यामुळे खांबांनाही रोहित्राची प्रतीक्षा करावी लागत आहे.सध्या मुस्लिम धर्माचा रमजान व हिंदू धर्मियांचा श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भारनियमन बंद केलेले आहे. तर दुसरीकडे या महिन्यात ग्रामस्थांना महावितरणच्या कारभारामुळे अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे.
१५ दिवसांपासून अर्धे रोहिलागड अंधारात
By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST