वैजापूर : तब्बल पाच वर्षांपासून गटशिक्षणाधिकारीपद रिक्त आहे. या कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अशा एकूण ४५५ शाळांचा कारभार प्रभारीपदावर सुरू आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून वैजापूर येथे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देता आले नाही. जिल्हा परिषद प्रशासनाची ही उदासीनता पाहता शैक्षणिकबाबतीत ते गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.
२०१५ पासून येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारीपद रिक्त आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी एस. एफ. शिरुडे यांच्यानंतर कायमस्वरूपी अधिकारीच मिळाला नाही. दरम्यानच्या काळात टी. एच. सय्यदा यांचा साधारणतः सात महिन्यांचा कालावधी वगळता तब्बल चार ते पाच वर्षांपासून हे पद रिक्तच आहे. तेव्हापासून ते आजतागायत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून वेगवेगळ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार आहे. शिरुडे यांच्या बदलीनंतर शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, के. एस. चंदिले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. दिवेकर यांच्याकडे सुरुवातीला १६ महिन्यांसाठी पदभार देण्यात आला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१८ पासून ते आजतागायत तेच प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२० व खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा एकूण ४५५ शाळा आहेत. २०१५ या वर्षाचा अपवाद वगळता शिक्षण विभागाने कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी दिलेला नाही. प्रभारी अधिकारी असल्यामुळे शैक्षणिक कार्याला मर्यादा पडतात. प्रभारी अधिकारी म्हणून दिवेकर यांनीच जवळपास चार वर्षे पूर्ण केली. त्यांच्याकडे आतापर्यंत दोनवेळा पदभार देण्यात आला. तालुक्याचा शैक्षणिक विस्तार व शाळांची संख्या पाहता कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने हे पद भरण्याबाबत नेहमीच उदासीनता दाखविली आहे.
एवढेच नव्हे, तर या कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह अन्य पदेही रिक्त आहेत. याकडे विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५ पदे मंजूर असून, ३ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिकाचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. याशिवाय शिपायाचे एक व केंद्रप्रमुखांची १८ पैकी तब्बल ११ पदे रिक्त आहेत.