औरंगाबाद: सातारा-देवळाई परिसर १२ महिने टँकरच्या पाण्यावर विसंबून असतो. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील भूजल पातळी २५ टक्क्याने वाढली आहे. सातारा-देवळाईत यंदा जुलैपासूनच टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या. सप्टेंबरमध्ये तर पावसाचे पाणी कॉलन्यात शिरले व परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु दररोज खिशाला न परवडणाऱ्या भुर्दंडापासून सुटका मिळालेली आहे.
पुनर्भरणाचे महत्त्व कळले
परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा ही सिंचनाची कामे देखील राबविण्यात आलेली आहे. कॉलनी व बंगला तसेच कॉम्प्लेक्सचे पावसात वाहून जाणारे पाणी बोअरवेलमध्ये पुनर्भरण केलेले आहे. कारण सातारा-देवळाईत पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटलेले आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी झालेल्या आहेत.- अशोकराव तिनगोटे
पाणी जपूनच वापरा
१२ महिने परिसराला टँकरमुक्ती नाही, अशीच गणिते जुळविली जातात. परंतु यंदा पावसामुळे वॉटर लेव्हल २५ टक्क्याने वाढलेली आहे. त्या पाण्याचा गैरवापर टाळावा, भविष्यात ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे.
- डॉ. प्रशांत अवसरमल
आकडेवारी घेणे सुरू
पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शहरात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. सातारा-देवळाईच्या बाजूला असलेल्या डोंगर असून, बहुतांश ठिकाणी पाणी अडविलेले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली आहे. चार महिन्याला वॉटर लेव्हल घेतली जाते. त्यामुळे महिना अखेर निरीक्षणातून आकडे स्पष्ट होतील.
- बी. एस. मेश्राम, (उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद विभाग)