वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला उमेदवारांनी जोरात सुरुवात केल्याने प्रचारात रंगत येत आहे. बहुतांश उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत त्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, नारायणपूर, अंबेलोहळ, पंढरपूर या मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच जोर लावला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मातब्बर पदाधिकाऱ्यांनी राजकीय डावपेच आखले आहेत. आता निवडणुकीच्या रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला थारा न देता अनेक जण सोयीनुसार हातमिळवणी करीत पॅनल तयार करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पॅनलच्या माध्यमातून मतदारांना भरमसाठ आश्वासने देऊन विकास कामाचे स्वप्न उमेदवारांकडून मतदारांना दाखविले जात आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वॉर्डावाॅर्डात स्वतंत्रपणे जाहीरनामा प्रकाशित करून उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरू केला आहे. पदयात्रा व कॉर्नर मीटिंगा घेऊन उमेदवार मतदारांशी संवाद साधत आहेत. बहुतांश उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीवर जोर देऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांना ताकीद
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. बुधवारी (दि.६) पंढरपूर व जोगेश्वरी येथे उमेदवार व नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत गैरप्रकार व गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चौकटीत प्रचार करावा, उमेदवाराकडून दबावतंत्राचा वापर केला जात असल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
फोटो ओळ- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेऊन उमेदवार व नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या.