जालना : ‘बोल बजरंग बली की जय’ असे म्हणत ढाक्कूमाकूमच्या तालावर ठेका धरत जालन्यातील गोविंदा पथकांनी विविध भागात सोमवारी दहिहंड्या फोडून आनंदोत्सव साजरा केला. शहरात सुमारे १०० दहिहंड्या फोडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दहिकाला उत्सवाची तयारी शहरात रविवारपासूनच सुरू होती. १२ वर्षावरील बालगोविंदांना यंदा मुभा मिळाली. थरांच्या उंचीचे बंधनही नसल्याने गोविंदा पथकांमधील उत्साह दरवर्षीप्रमाणे कायम होता. सकाळपासूनच पथके हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली होती. नवीन जालन्यातील मामा चौक, सिंधी बाजार, शिवाजी पुतळा, अलंकार, कन्हैय्यानगर, रामनगर, गांधीनगर, काद्राबाद, पाणीवेस यासह जुना जालन्यातील मस्तगड, गांधीचमन, शनिमंदिर, गणपती गल्ली, मुक्तेश्वर प्रवेशद्वार, नूतन वसाहत इत्यादी भागातील गोविंदा पथकातील सदस्यांनी दहिहंडीचे टी शर्टस् परिधान केले होते. गोपालकृष्णाची मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत श्रीकृष्णाचा जयजयकार केला. काही ठिकाणी २० फूट, २५ फूट तर काही ठिकाणी ३० फूट उंचीवर लोण्याच्या हंड्या लावण्यात आल्या होत्या. पथकातील तरूणांनी थर लावत ‘बजरंग बली की जय, गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा घोषणा देत लोण्याच्या हंड्याकडे आगेकूच करीत एकदा, दोनदा पडत पुन्हा थर लावत हंड्या फोडण्यात यश मिळविले. हंडी फोडल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. शहरात गांधीचमन येथील दहिकाला उत्सवाच्या वेळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक मार्गात काही काळ बदल केला होता. (प्रतिनिधी)दहिहंडीनिमित्त विविध चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा ६५ डेसिबलपेक्षा कमी आवाजातच ठेवण्याच्या सूचना करण्यात येत होत्या. प्रत्यक्ष थर रचण्यात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या नावाची नोंद करण्यात आली होती. ४शहरात काही ठिकाणी दहिकाला उत्सव साधेपणानेच साजरा करण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी थरांची स्पर्धा नव्हती. अनेक ठिकाणी हंडी फोडणाऱ्या पथकांसाठी विविध पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोख पारितोषिकांचाही समावेश होता.
गोविंदा पथकांचा दहिहंडी फोडण्याचा थरार
By admin | Updated: August 19, 2014 02:09 IST