औरंगाबाद : महापालिका आयुक्त पी. एम. महाजन यांनी भाजपा गटनेते संजय केणेकर यांच्या विरोधात पोलिसांत दिलेल्या तक्रारीला राजकीय गंध असल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी केला. दोन दिवस घटनेला उलटल्यानंतर आयुक्तांना पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला देण्यामागे कुठला तरी राजकीय पक्ष (शिवसेनेचे नाव न घेता) असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांनी राजकारणात पडू नये व राजकारणदेखील करू नये, असा सल्लाही भाजपाने पत्रकारांशी बोलताना दिला. शनिवारी महापौर कला ओझा, आयुक्त व पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली होती. त्या बैठकीत आयुक्तांना शिवसेनेकडून धीर देण्यात आला होता. त्यानंतर आज भाजपाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना नरमाईचा सल्ला दिला, शिवाय विकासकामे करण्यासाठी उपायही सुचविले. घडामोडे म्हणाले, आयुक्तांनी दिलेली तक्रार कुणाच्या तरी सांगण्यावरून करण्यात आली आहे. महाजन यांनी कुणाच्या सांगण्यावरून राजकारण केले तर आम्ही सहन करणार नाही. विकासकामे करण्यासाठी त्यांनी विचार केला पाहिजे. कारण मनपा निवडणुकीला थोडे दिवस राहिले आहेत. दोन दिवसांनंतर आयुक्तांनी तक्रार का दिली. त्याच दिवशी तक्रार का केली नाही. प्रवक्ते बोराळकर म्हणाले, दोन दिवस त्यांना विचार करायला लागले असतील, त्यामुळे तक्रारीला उशीर लागला असेल. केणेकरांचे प्रकरण पुढे करून जरी भाजपा शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेतली असली तरी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला विकासकामे हवी आहेत. आयुक्तांनी केणेकर म्हणजेच पूर्ण भाजपा असा समज करून घेतला तर सर्व नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे रखडतील. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी भाजपा प्रवक्ते, शहराध्यक्ष, उपमहापौरांनी मारण्याचा प्रयत्न केला. २बोराळकर म्हणाले, भाजपा विकासकामांसाठी आयुक्तांना भेटले. महिन्यापासून विकासकामे रखडले आहेत. लोकांना वेठीस धरले जात आहे. विकासकामे करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कंत्राटदार, अभियंत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. केणेकर व आयुक्तांमधील वाद दुर्दैवी आहे. त्याप्रकरणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
आयुक्तांच्या तक्रारीला राजकीय गंध!
By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST