कळंब : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयाचे खातेप्रमुख, कर्मचारी मुख्यालयी न राहता इतरत्र राहून अपडाऊन करत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या अपडाऊनचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून, सरकारी बाबू कार्यालयात उपस्थित नसल्याने एकूणच कामकाजावर परिणाम झालेला दिसून येत आहे.कळंब शहरात तहसील पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी या कार्यालयाबरोबरच लघु पाटबंधारे उपविभाग (जि. प.), ल. पा. स्थानिक स्तर (जलसंपदा), लघु पाटबंधारे उपविभाग भूम मुख्यालय कळंब, लघु पाटबंधारे (राज्य) उपविभाग, दुय्यम नोंदणी, सहायक निबंधक, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जि. प. बांधकाम उपविभाग, गटशिक्षणाधिकारी, निरीक्षक भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, दुकाने निरीक्षक आदी विविध शासकीय विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय कार्यरत आहेत. या शासकीय कार्यालयातील विविध खातेप्रमुख आपल्या मुख्यालयी राहत नसून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक वगळता अन्य कार्यालयाचा कारभार उंटावरून शेळ्या राखणे या म्हणीप्रमाणे चालविला जात आहे. विशेषत: काही विभागाच्या खातेप्रमुखांना शासकीय निवासस्थान उपलब्ध असतानाही त्यामध्ये राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय लघु पाटबंधारे विभागाचे सर्वच उपविभागीय अभियंता बाहेबगावी राहत असून, साहेबच मुख्यालयी थांबत नसल्याने त्यांच्याखालील शाखा, कनिष्ठ अभियंता स्तरीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, हीच अवस्था तालुका कृषी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जि. प. बांधकाम आदी विभागाच्या खातेप्रमुखपदी आहे. अधिकारीही भेटणे दुर्लभमहावितरण कंपनीचे ज्या-त्या युनिटचे कनिष्ठ अभियंता जि. प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्याकडे विकास कामाची तांत्रिकदृष्ट्या देखभाल करणे, सुधारणा करणे आदी महत्वाची कामे असतात. असे असतानाही यातील बहुतांश अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेकांचे भ्रमणध्वनी लागत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामपंचायतीना शेतकऱ्यांना विविध कामासाठी या कर्मचाऱ्यांचे मुखदर्शन होणेही दुर्लभ झाले आहे. यामुळे महसूल विभागाने अशा कार्यालयाचा अचानक पंचनामा करून गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)कामकाजावर परिणामअधिकारी मुख्यालयी स्थानिकला राहत नसल्याने बाहेर गावावरून ये-जा करतात. याचा सर्वसामान्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून साहेबांची उपस्थिती केव्हा लाभेल, हे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनाही सांगता येत नाही. याबाबत अधिकच चौकशी केली असता सरळ जिल्हास्तरावर मिटींग असल्याचे कारण सांगितले जाते. खातेप्रमुख मुख्यालयी असल्यावर ऐनवेळा एखादा प्रसंग, तातडीचे काम निघाल्यास तातडीने निर्णय घेता येतो. परंतु कळंब तालुक्यात हे अधिकारी राहत नसल्याने कार्यक्षम निर्णय तर सोडाच नागरिकांची नियमित भेटही होत नाही.
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अपडाऊन
By admin | Updated: July 19, 2014 00:42 IST