विद्यापीठ : अधिसभेच्या बैठकीत सदस्यांचा सूर, विविध विषयांवर वादळी चर्चा
--
औरंगाबाद : ‘डाॅक्टर चांगले उपचार करतात. मात्र, नंतर त्यांचे सहकारी लक्ष देत नसल्याने मलमपट्टी व्यवस्थित करत नाहीत.’ अशा शब्दांत विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर अधिसभेत ताशेरे ओढल्या गेले. तर कुलगुरु डाॅ. प्रमोद येवले यांनी सत्ताधारी पक्षाशी संलग्न सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नावर पाठपुरावा समिती बनवून त्याचे नेतृत्व तुम्हीच करा, असे म्हणत विद्यापीठाच्या कार्यकक्षेबाहेरील विषयांवर शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी नाट्यगृहात पार पडली. ५५ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले तर मंचावर प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठातील अधिसभा सदस्यांना बॅच-ओळखपत्र उपलब्ध करुन दिले गेले. प्रारंभी नवनियुक्त सदस्य डॉ. शाम शिरसाठ, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.योगेश पाटील, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे आदींचा सत्कार करण्यात आला. गेल्या वेळची अधिसभा बैठक १३ मार्चला झाली होती. त्यानंतर साडे नऊ महिन्यात झालेली घडामोड, विद्यापीठाने राबविलेले उपक्रम व कोविडच्या काळात विद्यापीठात केलेल्या सामाजिक कार्याची माहीती कुलगुरु डॉ. येवले यांनी दिली.
--
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती
---
विद्यापीठ निधीतून कंत्राटारामार्फत रोजंदारी तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी सुरुवातीलाच अॅड. विजय सुबुकडे, भाऊसाहेब राजळे, डॉ. रमेश भुतेकर, डॉ. जितेंद्र देहाडे व प्रा.सुनील मगरे यांनी केली. यावर कुलगुरुंनी एकत्रीत ४५३ कंत्राटी व १०० फिक्स पे वरील असे ५५३ कर्मचाऱ्यांना शासन कायम करणार नाही. त्यामुळे यासंबंधी अभ्यासकरुन कुशल व अकुशल असे टप्प्याटप्प्याने प्रस्ताव दाखल करा. त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मागणी करणाऱ्या सदस्यांचीच समिती बनविण्याचे स्पष्ठ केले. यावेळी सुबुकडे यांना मनपाच्या निवडणुकीत तुम्हाला उभे राहायचे आहे. आता तुम्ही बसुन घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.
----
प्रश्नोत्तरात प्रशासनावर ताशेरे
---
दुपारी तीन ते चारच्या दरम्यान प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.भारत खंदारे, प्रा.सुनील मगरे, प्रा. संजय गायकवाड, अॅड. सुबुकडे, भाऊसाहेब राजळे, डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ. शेख जहूर खालिद, डॉ. सदाशिव सरकटे, डॉ. सतीश दांडगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. जितेंद्र देहाडे, गोविंद देशमुख, डॉ. गोविंद काळे, डॉ. मुंजाबा धोंडगे, नरहरी शिवपुरे आदी सदस्यांनी लेखी प्रश्नांतून झालेली दिशाभुल मांडत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, डॉ.योगेश पाटील, डॉ. हरिदास विधाते, डॉ.राहुल मस्के, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, संजय निंबाळकर आदींनी उत्तरे दिली.
---
फोटो ओळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत बोलतांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, यावेळी प्र.कुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी.