औरंगाबाद : आपले स्वत:चे हात पिवळे करण्याआधी ५७ वर्षीय वडिलांना वृद्धापकाळी जोडीदार मिळावा यासाठी गुजरातमधील १९ वर्षीय मुलगी रविवारी औरंगाबादेत आली होती. एवढेच नव्हे तर सासऱ्यांच्या पुनर्विवाहासाठी एक जावई चक्क नागपूरहून आला. शहरातील एक ४८ वर्षीय घटस्फोटित महिला उतरत्या वयात आधार मिळावा यासाठी जोडीदाराचा शोध घेत होती. हे सर्व जण रविवारी सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात एकत्र आले होते. प्रसंग होता सकल मारवाडी युवा मंचच्या वतीने आयोजित विशिष्ट वर्ग परिचय संमेलनाचा. मारवाडी समाजातील १७ पोटजातींमधील नागरिक एकत्र आले होते. अपंग, घटस्फोटित, विधवा, विधुर व ज्यांचे वय अधिक झाले अशांचे लग्न जुळावे, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समाजसेवा केंद्राचे संयोजक स्वरूपचंद बरंठ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक राधावल्लभ धूत, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय अध्यक्ष सुनील खाबिया, सकल मारवाडी समाजाचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी, सुनंदा लाहोटी, युवा मंचचे अध्यक्ष संजय मंत्री, कार्याध्यक्ष अनिल बाहेती, सचिव अमित काला यांची प्रमुख उपस्थिती होती. १९ वर्षांची मूकबधिर मुलगी गुजरातमध्ये टेक्स्टाईल डिझायनरचा कोर्स करते. तिच्या आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तिचे लग्न पुढील एक ते दोन वर्षांत होईल. मग घरी वडील एकटेच राहतील. ५७ वर्षीय वडिलांची काळजी घेणारी जोडीदार मिळावी, म्हणून ती वडिलांना घेऊन आली होती. पेशाने वकील असलेल्या सासऱ्यांना घेऊन एक जावई नागपूरहून आला होता. आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून देण्यासाठी काही सासू-सासरेही आले होते.
वडिलांच्या लग्नासाठी मुलीचा पुढाकार
By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST