जालना : दोन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी रवी अशोक घुमारे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी बुधवारी दोषी ठरविले आहे. सरकार पक्षाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची विनंती केली असता फाशी की जन्मठेप ? यावर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.सदर घटना जुना जालना भागातील इंदिरानगरमध्ये ६ मार्च २०१२ रोजी घडली होती. सदर घटनेनंतर जालना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. संतप्त जमावातील काहींनी कचेरी रोड, वृंदावन कॉलनी या भागात वाहनांसह घरांवर दगडफेक करून मोठे नुकसान केले होते.जुना जालन्यातील इंदिरानगर मधील दोन वर्षाची बालिका ६ मार्च २०१२ रोजी घरासमोर खेळत असताना त्या बालिकेस रवी घुमारे याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेले व स्वत:च्या घरात लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासाअंती रवी घुमारे याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यात पिडीत मुलीचे वडिल व इंदिरानगर भागातील शेख अजहर शेख उस्मान, शेख अस्लम शेख अहेमद, पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर, पो.कॉ. संजय कटके, वैद्यकीय अधिकारी डॉ. भानुदास सुरवसे, डॉ. रवींद्र बेदरकर व डी.एन.ए. तज्ञ श्रीकांत लादे यांच्यासह तपास अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. समोर आलेला पुरावा व दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी आरोपी रवी अशोक घुमारे यास दोन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याबद्दल दोषी असल्याचा निकाल बुधवारी सुनावला. त्यानंतर शिक्षेवर सुनावणी दरम्यान सरकारपक्षातर्फे आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत विनंती करण्यात आली. फाशी की जन्मठेप, यावर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकण्यासाठी न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे काम पहात आहेत. (प्रतिनिधी)
बालिका बलात्कार व खून प्रकरणी तरुण दोषी
By admin | Updated: September 17, 2015 00:26 IST