अशोक कांबळे , वाळूज महानगरपोलीस आयुक्तालय आणि एमआयडीसी पोलिसांनी मोठा गाजावाजा करून वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी गाव दत्तक घेतले. या गावात पोलिसांनी काही स्तुत्य उपक्रमही सुरू केले; पण पोलिसांच्या उदासीन धोरणामुळे दत्तक योजनेला घरघर लागली आहे. वडगाव कोल्हाटी गावातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी आयुक्तालयाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी गाव दत्तक घेतले. या योजनेंतर्गत विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जात होते. त्याला गावातील नागरिकांचा प्रतिसादही चांगला होता.विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केले. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने विविध बचत गटांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रत्येक महिन्याला दारूबंदी, आरोग्य शिबीर, हुंडाबळी आदी उपक्रम राबविले जात होते. युवकांसाठी व्यायाम शाळा बांधली. तरुण- तरुणींना पोलीस, सैन्य प्रशिक्षण देणे सुरू केले. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पंडित वाघ, अशोक नरवडे या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. संजयकुमार यांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतर गावात पहिल्यांदा शहर बस सुरू झाली. दत्तक योजनेमुळे गावातील गुन्हेगारीवर अंकुश बसला होता. आयुक्त संजयकुमार यांची बदली झाल्यानंतर दत्तक वडगाव कोल्हाटी योजनेला घरघर लागली आहे. विद्यमान पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी वडगावला भेट देऊन दत्तक योजना पुढे कायम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांनीही दोन- तीन वेळा भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता; परंतु नंतर याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. पोलिसांच्या या उदासीन धोरणामुळे गावातील पोलीस मैदान ओस पडले आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सभागृह धूळखात पडले आहे. क्रीडांगणावर खेडाळंूऐवजी मोकाट जनावरे, शेळ्या आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पोलीस प्रशिक्षणाव्यतिरिक्त एकही उपक्रम सुरू नाही. व्यायामशाळेत व्यायामाचे एकही साहित्य नाही. गावात दारू विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तरुण वर्ग पुन्हा गुन्हेगारीकडे वळत आहे. यासंदर्भात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंह बहुरे यांच्याशी विचारणा केली असता मी कामात आहे. याविषयावर काहीच बोलू शकत नाही, असे नमूद केले.शिष्टमंडळ आयुक्तांना भेटणारदत्तक वडगाव कोल्हाटी गावाकडे तत्कालीन पोलीस आयुक्त संजयकुमार जातीने लक्ष घालत होते. १५-२० दिवसांनी भेट देऊन गावाचा आढावा घेत असत. परंतु सध्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लवकरच गावातील शिष्टमंडळ पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन बंद पडत चाललेल्या दत्तक योजनेला गती देण्याची मागणी करणार असल्याचे उपसरपंच सुनील काळे यांनी सांगितले.
दत्तक योजनेला घरघर..!
By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST