बीड : विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करुन आपले ज्ञान वाढवावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशाची शिखरे काबीज करावीत, असे प्रतिपादन ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले. सोमवारी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसीतील गुणवंतांचा गौरव कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. रणधीर परळकर, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, प्रकाश राऊत, कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर आजीनाथ गवळी, जि.प. सदस्य शिवप्रसाद खेत्री, स्वप्नील मुळे, विश्वास आखाडे आदी उपस्थित होते. बापूसाहेब भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई यांना शिकवले. त्यामुळे आज महिलांनी विविध क्षेत्रात शिक्षणाच्या जोरावर भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे काबिज करताना जास्तीत जास्त ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्याने दहावी, बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. यशाची ही परंपरा क ायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, मनगटात शक्ती अन् लेखणीत बळ असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळविणे सोपे आहे. विद्यार्थ्यांनी कसब व कौशल्य दाखवून स्वत:ला सिद्ध करावं. जिल्ह्यातील चार मुले स्पर्धा परीक्षेत चमकली. हा टक्का वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विज्ञान - तंत्रज्ञानात रोज नवे बदल घडत आहेत. त्याचा वापर करुन विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या खुणा उमटाव्यात असे आवाहन त्यांनी केले. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन सरकारने पुरोगामित्व सिद्ध केले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला आता लिंगायत व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असेही ते म्हणाले. डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. पंडित तुपे, अंकुश निर्मळ यांची भाषणे झाली. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पालक नागरिक उपस्थित होते.ओबीसी विद्यार्थ्यांची फरफट थांबवा प्रास्ताविक अॅड. सुभाष राऊत यांनी केले. ते म्हणाले, गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. हा कार्यक्रम अविरतपणे सुरु ठेवणार असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा हेतू आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद आहे ती पुन्हा सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून अनेकांवर शिक्षण बंद करण्याची वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक शिक्षणाने यश मिळवा- भुजबळ
By admin | Updated: July 15, 2014 00:49 IST