केज : जमिनीचा फेरफार करण्यासाठी लेखनिकामार्फत शेतकऱ्याकडून २२०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला व लेखनिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले. केज ठाण्यात गुन्हा नोंद करून दोघांनाही अटक करण्यात आली.अनिल लक्ष्मण कुलकर्णी असे त्या तलाठ्याचे नाव असून, तो गावातीलच तुळशीराम जगन्नाथ मुकादम या खासगी लेखनिकाकडून पैसे घेताना पकडला. माळेगाव सज्जांतर्गत सुकळी येथील शेतकऱ्याला तीन एक्कर जमीन आहे. वारसा हक्काप्रमाणे त्यांना आपले नाव फेरफारला लावायचे होते. त्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात रितसर अर्ज केला. तेव्हा तलाठी कुलकर्णी याने शेतकऱ्याकडे २२०० रूपयांची लाच मागितली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरूवारी शहरातील खासगी तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. लाच स्वीकारताच मुकादम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.ही लाच कुलकर्णी याच्यासाठी स्वीकारल्याचे त्याने कबूल केले. ही कारवाई उपअधीक्षक भाऊसाहेब गोंदकर, निरीक्षक गजानन वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (वार्ताहर)
तलाठ्यासह लेखनिक लाच प्रकरणी गजाआड
By admin | Updated: March 18, 2016 01:57 IST